Breakfast receipe: नाश्त्यासाठी बनवा काबुली चन्याचे टेस्टी कबाब

काही हटके रेसिपी करायची असेल तर काबुली चन्याचे टेस्टी कबाब नक्की ट्राय करा.

रोज सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. कारण पोहे, उपमा, इडली, डोसा, पराठा , ब्रेड बटर असे तेच तेच पदार्थ खाऊन मुलंच नाही तर घरातील मोठेही कंटाळतात. यासाठी काही हटके रेसिपी करायची असेल तर काबुली चन्याचे टेस्टी कबाब नक्की ट्राय करा.

साहीत्य-अर्धा कप भिजलेले काबुली चने, अर्धा कप पनीर,अर्धा कप उकडलेला बटाटा, चार चमचे तूप, १ चमचा तेल, १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, २ बारीक चिरलेल्या मिरच्या, अर्धा चमचा बारीक चिरलेले आले, अर्धा चमचा जीरे, १ चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर,पाव चमचा लाल मिरची पावडर, १ लहान चमचा मीठ चवीनुसार.

कृती- सर्वप्रथम कढईत तेल गरम करुन घ्या. नंतर त्यात भिजवलेले चने खरपूस परतून घ्या. परतताना त्यात धने पावडर, आलं, हिरवी मिरची टाका. नंतर त्यात गरम मसाला, आमचूर पावडर, लाल तिखट,, मीठ टाकून मिश्रण परतून एकजीव करा. मिश्रण थंड झाल्यावर मिकसरमध्ये त्याची पेस्ट करा.

दुसऱ्या एका बाऊलमध्ये बटाटा आणि पनीर एकत्र कुसकरून घ्या. त्यात मिक्सरमधली चन्याची पेस्ट टाका. सर्व मिश्रण एकत्र करा त्यात मीठ आणि धने पावडर टाका हे मिश्रण एकत्र मळून घ्या. हातावर थापून त्याचे गोल कबाब बनवा आणि गरम तेलात हलके फ्राय करा. हिरव्या चटणीबरोबर खाण्यास द्या.