भारताचा इतिहास म्हटलं की आपल्याला आठवतात ते राजेमहाराजे,त्यांच्या राण्या आणि त्यांची राजघराणी. यातीलच काही राजे त्यांच्या शूर, पराक्रमी युद्धकौशल्यांसाठी ओळखले जातात. पण या राजे महाराजांप्रमाणेच काही महिलाही वीर योद्ध्या होत्या. त्यांचं कर्तृत्वही कोणीच नाकारू शकत नाही. देशाच्या राजकारणात अशा अनेक महाराण्या होऊन गेल्या आहेत. ज्यांची शौर्यगाथा ही महाराजांपेक्षा काही कमी नाही. अशीच एक शक्तिशाली महाराणी आपल्या महाराष्ट्रातही होऊन गेली. जिचं नाव चाँद बिबी उर्फ चांद खातून उर्फ चांद सुलताना! तुम्हाला आश्चर्य वाटेल पण चाँद बिबी ही अशी राणी होती जी मुघलांशी थेट लढली.
चांद बीबी यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला थेट 15 व्या शतकात जावे लागेल. 1500 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात चांद बीबी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अहमदनगरचे हुसेन निजाम शाह. त्यांना परिसरात मोठी प्रतिष्ठा होती. चांद बीबी लहान असतानाच तिचे वडील वारले. आई गृहिणी होती. राजघराण्यातील तिचे संगोपन झाल्यामुळे चांद बीबी चांगली घोडेस्वारी शिकली. फारसी आणि अरबी भाषेबरोबरच तिने मराठी भाषाही आत्मसात केली.
एका तहानुसार विजापूर साम्राज्याचा राजा अली आदिल शाह याच्याशी चांदबिबीचा पहिला विवाह झाला होता. आदिल शाह यांनी विजापूरमध्ये पूर्वेला एका विहीर बांधली. चांदबिबीच्या सन्मानार्थ बांधलेली ही विहीर चांदबावडी नावाने ओळखली जाते.
चांद बीबीचे लग्न अगदी लहान वयात झाल्याचे सांगितले जाते. चांद बीबी 14 वर्षांची असताना काही वर्षांनी तिच्या पतीचे निधन झाले. अली आदिल शाह पहिला याच्या पुढाकाराने त्याचा पुतण्या इब्राहिम आदिल शाह याला गादीवर बसवण्यात आले. तसेच चांद बीबी यांची राज्याच्या संरक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
परंतु 1580 मध्ये तिचा पती आदिल शाह मरण पावला तेव्हा गादीवर बसलेल्यांमध्ये अराजक माजले. नंतर पुतण्या इब्राहिम आदिल शाह विजापूरच्या गादीवर बसला. आणि चांद बीबी राज्याच्या संरक्षक बनल्या.
चांद बीबी विरुद्ध कट :
त्यावेळी अनेक पुरुषांना स्त्री सत्तेत असणे पसंत नव्हते. यामुळेच चाँद बिबीच्या विरोधात अनेक कट रचले जाऊ लागले. त्यांचे अत्यंत विश्वासू मंत्री कमाल खान यांनी त्यांचा विश्वासघात केला होता. त्याने प्रथम सुलतान इब्राहिमला गादीवरून हटवले आणि नंतर चांद बीबीला तुरुंगात टाकले आणि तो स्वतः सुलतान बनला. पण तो गादी ताब्यात घेऊ शकला नाही. शेजारच्या राज्यांनी विजापूरवर हल्ला केला, त्यानंतर चांद बीबीने या हल्ल्यातून सुटण्यासाठी मराठ्यांची मदत घेतली.
चांद बीबी आणि मुघल यांच्यातील संबंध :
इ.स. 1580 मध्ये पहिल्या अली आदिलशाहाच्या मॄत्यूनंतर आदिलशाहीत सत्तासंघर्षामुळे अंदाधुंदी माजली. निजामशाही बुडवण्यासाठी मुघलांनी अहमदनगरवर चाल केली. अशा कठिण स्थितीत सैन्यातील विश्वासू मंत्र्यांनीच विश्वासघात केला. त्यावेळी मुघल राजवट होती आणि सम्राट आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी राज्यांशी हातमिळवणी करत होते. दक्षिण भारतातील सर्व राज्ये मुघलांच्या ताब्यात आली. पण चांद बीबी मुघलांपुढे झुकली नाही आणि तिने मुघल सम्राट अकबराचा प्रस्ताव नाकारला. चांद बीबीने मुघलांपुढे शरणागती पत्करली नाही. अशा वेळेस बहादुरशाह निजामाचा पक्ष घेऊन मुघल सैन्याशी ती निकराने लढली. एका रात्रीत तिने किल्ल्याच्या पडलेल्या भिंतीची डागडुजी केली. मुघल सैन्याला पराभूत केले. तिने दाखवलेल्या या शौर्यामुळे तिला ‘चांद सुलताना’ हा किताब देण्यात आला. अहमदनगरच्या किल्ल्याला शत्रूने पाडलेले खिंडार चांदबिबीने एका रात्रीत बुजवले असे सांगितले जाते. मात्र असं जरी असलं तरी अकबराने अनेक वर्षे अहमदनगर किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. शेवटपर्यंत चांद बीबी मुघलांचा पराभव करत राहिली, पण तिचा विश्वासू सेनापती मुहम्मद खान याने मुघलांशी हातमिळवणी केली आणि अकबराने विजय संपादन केला.
चाँद बिबी इतिहासात शौर्य, युद्धकौशल्याचे प्रतीक म्हणून आजही ओळखली जाते.
हेही वाचा : Health Tips : कमकुवत हाडांमुळे वाढतो ऑस्टियोपोरोसिसचा धोका
Edited By – Tanvi Gundaye