बांगड्यांचे बदलते रुप

‘सौभाग्याचे लेणे’ म्हणून भारतीय संस्कृतीत बांगड्याचे महत्त्व आहे. या बांगड्यांनाही आता फॅशनने वेढले आहे.

Bangles

भारतीय संस्कृतीत सौभाग्य लेण्याला फार महत्व आहे. कपाळाचे कुंकू, गळ्यातील मंगळसूत्र, हिरवा चुडा, पायातील वेढणी, या सौभाग्य लेण्याला भारतीय संस्कृतीत फार महत्व आहे. जुन्या काळात लग्न झालेल्या स्त्रिया या विना बांगड्यांच्या रहात नसत. प्रत्येक भागाप्रमाणे चुड्याचा रंग बदलतो. महाराष्ट्रात हिरवा चुडा, उत्तरेत लाल व पांढरा चुडा, बंगालमध्ये हस्तिदंताच्या बांगड्या असे अनेक प्रकार. म्हणजेच भारतीय स्त्रीच्या हातात बांगड्या या असतातच मग त्याचा प्रकार, रंग, धातू कोणताही असो.

आजकालच्या जगात बांगड्यांचं वेड फारसं राहिलेलं नाही. बांगड्यांची जागा कडे, ब्रेसलेट्स, आणि अशाच वेगवेगळया गोष्टींनी घेतलेली आहे. या नवीन युगात फक्त गोलच नाहीत तर चौकोनी, षट्कोनी, अष्टकोनी, अशा वेगवेगळया आकाराच्या बांगड्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. हाताची शोभा वाढवणार्‍या बांगड्या व कडे वेस्टर्न किंवा इंडियन वेशभूषेतही वापरण्याची नवीन फॅशन आली आहे. हल्ली तर जीन्स व सलवार कुर्त्यावर आकर्षक बांगड्या वापरल्या जातात.

आजच्या बदललेल्या युगात बांगड्यांचेही नवे नवे प्रकार बाजारात आले आहेत. काचेच्या तसेच लाखेच्या विविध आकर्षक बांगड्या व कडे बाजारात उपलब्ध आहेत. लाकडाला गोलाकार कापून त्यात नक्षी कोरून सुंदर-सुंदर बांगड्या व कडे तयार केली जात आहेत. तसेच त्यावर सप्तरंगामध्ये पेंटींग करून पॉलिश केले जाते. कचकड्याच्या, काचेच्या, प्लास्टिकच्या, साध्या धातूच्या, लाकडाच्या अशा अनेक वेगवेगळया आकाराच्या, रंगाच्या बांगड्या बाजारात उपलब्ध आहेत. या बांगड्या अधिक आकर्षक व सुंदर असतात.

सुंदर व रंगीबेरंगी असलेल्या या बांगड्या 10 पासून 50 रुपयांपर्यंत बाजारात सहज उपलब्ध होत असतात. तरूणीमध्ये एका हातात घडयाळ व दुसर्‍या हातात बांगड्या वापरण्याची फॅशन आहे. तरूणांमध्येही काळ्या रंगाचे रबरी कडे किंवा तांबे, पितळ व स्टीलचे कडे वापरण्याची फॅशन आहे.

आजकाल सोन्याच्या, चांदीच्या, व्हाईट गोल्ड, प्लॅटिनम अशा अनेक धातूंच्या बांगड्या बाजारात उपलब्ध आहेत. पहिल्यांदा फक्त सोन्याच्या चार बांगड्या, पाटल्या, तोडे इथपर्यंतच मर्यादित होते. आता मात्र कडे, कंगन असे प्रकार उपलब्ध आहेत. महिला वर्गात साडी किंवा ड्रेसला मॅचिंग अशा बांगड्या व कडे वापरण्याची देखील पध्दत आता फॅशन मध्ये रुपांतरित होत आहे.