आजकाल बऱ्याच घरातील पालक अर्थात आई आणि बाबा हे दोघेही कामाला जातात. अशा परिस्थितीत, मुले घरात असतात. घर मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असले तरी पालकांच्या अनुपस्थितीत मुलांना घरी एकटे सोडणे अत्यंत जोखमीचे काम असू शकते. लहान मुलं खूप निरागस असतात. अशा वेळी घरी एकटे राहणाऱ्या मुलांना पालकांनी काही गोष्टी शिकविणे अत्यंत महत्वाचे असते. ज्याने तुमची मुले सुरक्षित राहतील.
अनोळखी लोकांशी बोलू नये – पालक कामाला जात असल्याने मुलांसोबत सतत राहणे शक्य नसते. अशा परिस्थितीत, मुलांना तुमच्या घरी किंवा दारात कोणी अनोळखी व्यक्ती आल्यास त्यांच्याशी बोलू नये, त्यांना घरात प्रवेश देऊ नये या गोष्टी शिकविणे गरजेचे आहे.
बाहेरून काही मागवू नये – अनेकदा मुलाला एकटे पाहून डिलिव्हरी करणारी व्यक्ती घरात घुसून मुलासोबत अनुचित घटना घडू शकते. त्यामुळे घरात आई बाबा नसताना बाहेरून काही मागवू नये ही गोष्ट मुलांना शिकविणे महत्वाचे आहे.
भीती काढून टाका – अनेक वेळा मुलांना घरात एकटे राहायला भीती वाटते. अशा वेळी पालकांनी मुलांना समजून त्याच्या मनातील भीती दूर करायला हवी. अन्यथा दररोज एकटे राहणाऱ्या मुलांच्या मानसिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
हानिकारक वस्तू समोर ठेऊ नका – मुलांना एकटे घरी सोडण्यापूर्वी तीक्ष्ण आणि टोकदार वस्तूंपासून मुलांना लांब राहायला शिकवा. जर मुल मस्तीखोर असेल तर चाकू, सुऱ्या, कात्री यासारख्या वस्तू मुलांपासून उंच अंतरावर ठेवा. शिवाय इलेक्ट्रिक बोर्डला चिकट टेप लावून ठेवा. ज्याने मुले सुरक्षित राहतील.
कॉल करण्यास शिकवा – काही घडल्यास मुलांना लगेचच तुम्हाला कळविण्यासाठी कॉल करण्यास सांगा. यासाठी तुम्ही तुमचा नं. त्यांच्या डायरीत किंवा वहीत लिहून ठेवायला हवा.
काम देऊन जा – ऑफिसला जाणारे आई-बाबा एकटे राहणारी मुले दिवसभर काय करत असतील या चिंतेत दिवसभर असतात. अशा परिस्थितीत, तुमच्या मुलाने काही करू नये अशी तुम्ही इच्छा असेल तर त्याचे एक वेळापत्रक बनवून त्याला कामे वाटून द्या. यात त्याच्या ॲक्टिव्हिटी, शाळेचा अभ्यास या सर्व गोष्टींचा समावेश असू द्या. अशाने तुम्ही घरी येईपर्यंत मुलं कामात व्यस्त राहील.
हेही वाचा : मुलांसाठी योग्य शाळा कशी निवडावी?