सध्या सर्वत्र व्हॅलेंटाइन डे चा उत्साह पाहायला मिळतोय. व्हॅलेंटाइन वीकमध्ये एकमेकांना चॉकलेट देऊनही आपलं प्रेम व्यक्त केलं जातं. चॉकलेट हे केवळ त्याच्या चवीसाठीच ओळखलं जात नाही तर ते तुमचा मूड देखील सुधारते. म्हणूनच प्रेमी युगुलं एकमेकांना भेट म्हणून चॉकलेट देतात. लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच चॉकलेट खायला फार आवडते. तुमच्या जोडीदाराला कोणते चॉकलेट आवडते हे वेगळे आहे. कारण सध्या बाजारात व्हाइट चॉकलेट, मिल्क चॉकलेट आणि डार्क ब्राउन चॉकलेट असे अनेक प्रकारचे चॉकलेट उपलब्ध आहेत आणि त्या प्रत्येकाची वेगळी खासियत आहे. खरंतर, या वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचे मिश्रण करून तयार केले जातात. अशा परिस्थितीत, या चॉकलेटच्या चवीबरोबरच, त्यापासून मिळणारे आरोग्यदायी फायदे देखील एकमेकांपेक्षा बरेच वेगळे आहेत. जाणून घेऊयात या वेगवेगळ्या चॉकलेटच्या प्रकारांविषयी.
मिल्क चॉकलेट :
मिल्क चॉकलेट हा जगभरात सर्वाधिक खा्ल्ला जाणारा चॉकलेट प्रकार आहे, कारण त्यात कोको, दूध आणि साखर हे जवळजवळ समान प्रमाणात असते. साखर आणि दुधामुळे हे चॉकलेट चवीला छान लागते, यात असलेल्या कोकोच्या गुणधर्मामुळे हे चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मिल्क चॉकलेटचे सेवन रक्ताभिसरण नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे मेंदूला होणारा रक्त पुरवठा वाढून तणावापासून आराम मिळतो. त्याच वेळी, याच्या सेवनाने हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यासारख्या समस्यांपासून मुक्तीही मिळते.
व्हाइट चॉकलेट :
मिल्क चॉकलेटनंतर, व्हाइट चॉकलेट हे सर्वात जास्त खाल्ले जाणारे चॉकलेट आहे, विशेषतः मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये हे चॉकलेट खाण्याचे प्रमाण अधिक आहे. जर आपण त्याचे आरोग्यदायी फायदे विचारात घेतले तर व्हाइट चॉकलेट खाणे हे प्रौढांसाठी देखील चांगले आहे. खरं तर, व्हाइट चॉकलेट फक्त साखर, दूध आणि कोको बटरपासून बनवले जाते; त्यात सॉलिड कोको आढळत नाही. कोकोऐवजी, कधीकधी त्यात चव आणण्यासाठी व्हॅनिला इसेन्स वापरले जाते. व्हाइट चॉकलेटचे सेवन केल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. दुधामुळे, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील शरीराला मिळते.
डार्क ब्राउन चॉकलेट :
डार्क ब्राउन चॉकलेट सामान्यतः तरुणांना आणि प्रौढांना जास्त आवडते कारण चव वाढवण्यासाठी त्यात साखर आणि दूध खूप कमी वापरले जाते. गडद तपकिरी चॉकलेटमध्ये 50 ते 90 टक्के सॉलिड कोको पावडर वापरली जाते, त्यामुळे ते मिल्क आणि व्हाइट चॉकलेटपेक्षा थोडे कडू लागते. पण त्याची स्वतःची विशिष्ट चव आहे, जी अनेकांना आवडते. खरंतर डार्क ब्राउन चॉकलेट त्याच्या चवीपेक्षा त्याच्या आरोग्यदायी फायद्यांसाठी जास्त ओळखले जाते. कोकोचे प्रमाण जास्त असल्याने डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. विशेषतः त्यामध्ये असलेले फ्लेव्हनॉल्स अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात आणि हृदयरोग व कर्करोगासारख्या घातक आजारांचा धोका कमी करतात. याशिवाय, डार्क चॉकलेट वजन कमी करण्यासही मदत करते, कारण त्यात असलेले फ्लेव्होनॉइड्स शरीरातील पचनक्रिया सुधारतात आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतात. डार्क चॉकलेटच्या सेवनाने भूकदेखील कमी होते त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. डार्क चॉकलेटमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असल्याने ते त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. याच्या सेवनाने त्वचा तरुण आणि निरोगी राहण्यास मदत होते.
अशाप्रकारे, प्रत्येक प्रकारच्या चॉकलेटचे स्वतःचे आरोग्यदायी फायदे असतात आणि म्हणूनच या व्हॅलेंटाइनच्या खास प्रसंगी, तुम्ही तुमच्या जोडीदाराला चॉकलेट भेट देऊन एक आरोग्यदायी ट्रीट देऊ शकता.
हेही वाचा : Promise Day 2025 : जोडीदाराला द्या ही खास प्रॉमिसेस
Edited By – Tanvi Gundaye