असं म्हटल जातं की आईवडिलांचं जे पहिलं मूल असतं ते सर्वात जास्त जबाबदार, मायाळू आणि नेतृत्वगुण असणारं असतं. तर मधलं मूल हे मनमर्जी करणारं असतं. त्यांच्यावर कामकाजाचा कोणताच दबाव फारसा नसतो. जेव्हा सगळ्यात लहान मुलाची गोष्ट येते तेव्हा भारतात सामान्यत: ही मुलं कुटुंबातील सर्वात लाडकी मुलं असतात. आईवडील, नातेवाईक आणि आजूबाजूचे शेजारीही त्याचे/ तिचे खूप लाड करतात. यासाठीच ते मूल खूप चंचल, मस्तीखोर आणि निडर असतं. मात्र जेव्हा बुद्धी किंवा हुशारीचा मुद्दा येतो तेव्हा मात्र मुलांबाबत बांधलेले हे सारे अंदाज खोटे ठरतात. एका संशोधनानुसार, सगळ्यात मोठ्या मुलाची बुद्धी सगळ्यात जास्त असते.
20 हजार लोकांचे परीक्षण :
या अभ्यासानुसार 20 हजार लोकांचे परीक्षण करण्यात आले होते. प्रत्येकाचा बुद्ध्यांक अर्थात आयक्यू यावेळी तपासण्यात आला. या अभ्यासानुसार, कोणत्या अपत्याने कोणत्या वेळी जन्म घेतला आहे यावरदेखील बुद्ध्यांक अवलंबून असल्याचं स्पष्ट झालं आहे. भावाबहिणींमध्ये सगळ्यात मोठ्या अपत्याकडे अपेक्षेप्रमाणे अन्य लहान भावंडांच्या तुलनेत आयक्यू लेव्हल जास्त असते. संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे हे बुद्ध्यांकातील अंतर फार नसते. खरंतर एखाद्याचे आपल्या भावंडासोबत कसे नाते आहे, याचा आपल्या आयुष्यातील व्यक्तीच्या यशस्विततेमध्ये प्रभाव पडत असतो.
भावा बहिणींच्या नात्यांमधील विज्ञान :
अनेकांना एकापेक्षा अधिक अपत्यं असतात. भाऊ असो वा बहीण. त्यांचा एक साधारण क्रम असतो. जसे की सगळ्यात मोठं मूल, मधलं मूल आणि लहान मूल. जेव्हा पहिलं मूल होतं तेव्हा अर्थातच आईवडिलांचं सर्वाधिक लक्ष हे त्या मुलावरच असतं. पहिल्या मुलावर आईवडील प्रयोगही अधिक करून पाहतात. ते प्रत्येक ट्रिक मुलावर वापरुन पाहतात की कोणती ट्रिक त्यावर काम करू शकेल आणि कोणती नाही. जेव्हा दुसरं किंवा तिसरं मूल होतं तेव्हा स्वाभाविकपणे पालकांचं लक्ष केवळ पहिल्या मुलाकडे न राहता ते सर्वांकडे विखुरलं जातं. कोणत्या क्रमांकाचे मूल कितपत बुद्धिमान आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते गुण आहेत या विषयावर वैज्ञानिक अनेक वर्षांपासून अभ्यास करत आहेत. झालेल्या संशोधनानुसार, सगळ्यात पहिल्यांदा जन्म घेतलेल्या अपत्याचा अर्थात आईवडिलांच्या पहिल्या मुलाचा बुद्ध्यांक हा दुसऱ्या क्रमांकाच्या अपत्यापेक्षा 1.5 पॉईंटने जास्त असतो. तर दुसऱ्या अपत्याचा बुद्ध्यांक हा तिसऱ्या अपत्यापेक्षा तुलनेने 1.5 पॉईंटने अधिक असतो. याचा अर्थ असा की प्रत्येक मनुष्याकडे आपल्या लहान भावंडाच्या तुलनेत 1.5 पॉईंटने अधिक बुद्ध्यांक असतो.
जास्त बुद्ध्यांक का असतो ?
हा फायदा यासाठी मिळतो कारण पहिले अपत्य आईवडिलांना खूप वेळ देते. त्याला भाषा शिकवण्यासाठी, व्यवहार शिकवण्यासाठी, त्याची बुद्धी वाढवण्यासाठी आईवडील खूप मेहनत घेतात. तर इतर अपत्यांना त्यांचे मोठे भाऊबहीण या गोष्टी शिकवत असतात. विज्ञान असंही सांगतं की पहिल्या मुलाला आईचाही अधिक फायदा मिळतो. कारण यावेळी आईचे वय कमी असते यामुळे आईच्या शरीरात अँटिबॉडीजचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे मुलांच्या मेंदूचा विकासही अधिक होतो.
हेही वाचा : Parenting Tips : तुम्हीही करताय प्लास्टिक रॅप पॅरेंटिंग?
Edited By – Tanvi Gundaye