Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल कोरोनानंतर नवं संकट! केस गळण्याचं प्रमाण वाढलंय; जाणून घ्या काय म्हणतायंत डॉक्टर

कोरोनानंतर नवं संकट! केस गळण्याचं प्रमाण वाढलंय; जाणून घ्या काय म्हणतायंत डॉक्टर

Related Story

- Advertisement -

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर अद्याप सुरूच आहे. दरम्यान, कोरोनावर मात केल्यानंतर देखील लोकांच्या समस्या कमी झाल्याचे दिसून येत नाही. अनेक वैद्यकीय क्षेत्रांशी संबंधित असलेल्या तज्ज्ञांच्या मते, कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये श्वसन आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या, रक्तवहिन्यासंबंधी आजार, न्यूरोलॉजिकल आणि रेनल कॉम्पलिकेशन दिसून येत आहे. या व्यतिरिक्त, उच्च रक्तदाब किंवा ताणतणाव, केस गळणे, थकवा जाणवणं, पाय सुजणे, फॅटी लिव्हर सारख्या समस्या कोरोनावर मात केलेल्यांमध्ये दिसून येत आहेत. यामध्ये मधुमेह आणि रक्तदाबसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये कोरोनानंतर ही समस्या वाढल्याचे दिसून येत आहे. कोरोनातून बरे झालेल्या अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, खोकला आणि पाय सुजल्याच्या समस्येने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे.

दरम्यान, दिल्लीत कोरोनावर मात केलेल्या रूग्णांमध्ये केस गळण्याच्या तक्रारींसह समस्येमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून आले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर एक महिन्यानंतर रूग्णावा केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. तर काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच काळात केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दिल्लीच्या अपोलो रुग्णालयातील एका डॉक्टरने असे सांगितले की, “त्यांच्याकडे आठवड्यातून केस गळत असल्याच्या चार ते पाच तक्रारी येत आहेत. मे महिन्यापासून केस गळण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ लागली असल्याचे त्यांनी सांगितले. तर एका अहवालानुसार, अलीकडच्या काळात केस गळण्याशी संबंधित प्रकरणांमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे.

केस गळणाऱ्या लोकांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

- Advertisement -

केस गळणाऱ्या लोकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशा रूग्णांमध्ये दुप्पटीने वाढ झाली असल्याचे इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ शाहीन नूरजदान यांनी सांगितले. या समस्येचे प्रमुख कारण पोस्ट कोविड इन्फ्लेमेशन हे आहे. डॉ शाहीन यांच्या मते, पोषण आहाराचा अभाव, वजनात अचानक बदल, हार्मोनल अडथळा आणि व्हिटॅमिन डी आणि बी १२ चे प्रमाण कमी होणे ही कोरोना संसर्गानंतर केस गळण्याची काही प्रमुख कारणे आहेत.

केस गळण्याची समस्या कायमस्वरूपी नाही

कोरोनावर मात केल्यानंतर केस गळण्याची समस्या काही ठराविक काळासाठी असल्याचे कॉस्मेटोलॉजी आणि प्लास्टिक सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ कुलदीप सिंग यांनी सांगितले. ही समस्या टेलोजेन इफ्लुव्हियम स्थितीमुळे होते. कोरोनादरम्यान ताप आणि इतर लक्षणांनी ग्रस्त झाल्यानंतर हा परिणाम दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाशी संबंधित केस गळणे सहसा त्यातून बरे झाल्यानंतर सुरू होत असल्याचे समोर आले आहे. साधारणपणे व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सहा-आठ आठवड्यांनी ही समस्या सुरू होते. मात्र केस गळणे तात्पुरती समस्या आहे. कोरोनाव्हायरस हे केस गळतीचे मुख्य कारण आहे याचा अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही.

- Advertisement -