तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की फिरायला जाण्यासाठी, हवापालटासाठी किंवा अनेक कारणांसाठी कर्मचारी खोटं बोलून कंपनीमधून रजा घेतात. बऱ्याचदा अशा रजा घेत असताना सर्वसाधारणपणे आजारी असण्याचं कारण पुढे केलं जातं. मात्र असं करणं आता कर्मचाऱ्यांना महागात पडू शकतं. मिळालेल्या माहितीनुसार, आता जर्मनीमध्ये एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. जर्मन कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांकडून खोटं बोलून आवश्यक नसलेली वैद्यकीय रजा घेतल्यानं कंपन्यांच्या उत्पादकतेवर परिणाम झाल्याचं कारण सांगितलं जातं. आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी जर्मन कंपन्यांकडून खासगी गुप्तहेरांकडून सेवा घेत वैद्यकीय रजेचा चुकीचा वापर करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
जर्मनीतील कंपन्या आता त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अशा खोट्या कारणांची तपासणी करण्यासाठी गुप्तहेर नेमत आहेत. कंपन्यांनी नेमणूक केलेले हे गुप्तहेर कर्मचारी खरोखरच आजारी आहेत की कर्मचाऱ्याने खोटं बोलून रजा घेतली आहे, हे शोधून काढणार आहेत. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागे खाजगी गुप्तहेर पाठवण्याचा हा नवीनच ट्रेंड जर्मनीमध्ये पाहायला मिळतोय.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या गुप्तहेरांनी अनेक कर्मचाऱ्यांचं खोटं कारण शोधून काढलं आहे. प्रत्यक्षात विनाकारण घेतल्या जाणाऱ्या या रजांमुळे कंपनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं. त्यामुळे कंपन्यांनी ही नवी युक्ती शोधून काढली असल्याचं म्हटलं जात आहे. आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी कंपन्यांकडून हेराची मागणीही वाढू लागली आहे. अशा अनेक एजन्सी आहेत ज्या गुप्तहेर पुरवण्याचंही काम करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी वर्षभरात एक हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये सेवाही दिली आहे. आतापर्यंत अनेक कर्मचारी खोटे बोलून रजेवर गेले असल्याचं या गुप्तहेरांनी शोधूनही काढलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रँकफर्ट-आधारित खाजगी गुप्तहेर फर्म लेंट्झ ग्रुपचे संस्थापक मार्कस लेंट्झ म्हणाले की ते सध्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हेरगिरीशी संबंधित 1200 प्रकरणे हाताळत आहेत. गेल्या काही वर्षांत अशी प्रकरणे दुपटीने वाढली आहेत. जर्मनीच्या विश्लेषणात्मक आकडेवारीनुसार, 2021 मध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याने सरासरी 11.1 दिवसाची रजा घेतली होती आणि 2023 मध्ये सरासरी आकडेवारीची हीच संख्या वाढून ती 15.1 पर्यंत पोहोचली आहे.
हेही वाचा : Parenting Tips : मुलांचा स्क्रीनटाइम असा करा कमी
Edited By – Tanvi Gundaye