घरलाईफस्टाईलअमाप सृष्टिसौंदर्याचे लेणे अंदमान

अमाप सृष्टिसौंदर्याचे लेणे अंदमान

Subscribe

भटकंतीच्या ओढीने सर्वदूर भारतभर भ्रमण होत गेलं. उत्तरेच्या काश्मीरपासून दक्षिणेच्या कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्वेच्या जगन्नाथ पुरीपासून पश्चिमेच्या कच्छच्या वाळवंटापर्यंत अनेक ठिकाणं या भटकंतीत पालथी घातली. परंतु, या सर्व भटकंतीत एक ठिकाण राहून गेलं होतं. आपल्या देशाच्या मुख्य भूभागापासून बंगालच्या उपसागरात सुमारे चौदाशे किलोमीटर दूर असलेल्या त्या ठिकाणाला म्हणजे अंदमान-निकोबार बेटांना भेट देण्याचा योग नुकताच आला.विमानाने मुंबईहून निघाल्यानंतर चेन्नईहून सर्वप्रथम थेट तिरुपतीला जाऊन बालाजी श्रीवेंकटेश्वराचे दर्शन घेतले.तिरुपतीचा मुक्काम खूपच प्रसन्न आणि आनंददायी होता.नंतर चेन्नईहून अंदमानला निघालो.अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरच्या विमानतळावर उतरतानाच विमानतळाला दिलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव पाहून उर अभिमानाने दाटून आला.राहण्याची व्यवथा विमानतळावरून साधारण चार किमीवर असलेल्या हॉटेलवर होती.या चार किमीच्या प्रवासात निळ्याशार पाण्यात पहुडलेल्या हिरव्यागार अंदमानची झलक दिसायला लागली.

दुपार टळत होती.देशाच्या अतिपूर्वेकडे असल्यामुळे अंदमानला सूर्यास्त लवकर होतो.त्यामुळे हॉटेलवर पोहोचताच सामान ठेवून लगेचच सेल्युलर जेल पाहायला निघालो.परंतु, ५ वाजताच अंधार पडायला सुरूवात झाल्यामुळे जेलमध्ये प्रवेश मिळू शकला नाही. मात्र, थोड्याच वेळात जेलमध्ये सुरू होणार्‍या ध्वनी प्रकाश कार्यक्रमाची तिकीटे काढून समोरच असलेल्या वीर सावरकर पार्कमध्ये गेलो.पार्कमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासह अनेक क्रांतिकारकांचे पुतळे आत्मबलिदानाच्या इतिहासाची साक्ष देत उभे होते. तेथील ध्वनी-प्रकाश कार्यक्रमात जेलमधील पुरातन पिंपळ वृक्षाच्या आत्मकथनाने सेल्युलर जेलचा सर्व इतिहास उलगडत जातो. मध्येच सावरकरांचे ‘जयोस्तुते’ सुरू होते आणि अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात.

- Advertisement -

दुसर्‍या दिवशी याच इतिहासाची सेल्युलर जेल पाहताना उजळणी होते.जेल परिसरात जागोजागी ब्रिटिशांच्या मानसिक क्रौर्याची छाप उमटलेली दिसून येते.तेथील घंटा, फाशी घर, कोल्हा, कैद्यांना बांधल्या जाणार्‍या बेड्या, शिक्षेसाठीचा पोशाख हे सर्व पाहून मन विषन्न होतं.नंतर स्वातंत्र्यासाठी यमयातना भोगणार्‍या स्वातंत्रवीर सावरकरांच्या कोठडीत जाऊन नतमस्तक झालो.जड अंतकरणाने सेल्युलर जेलचा निरोप घेतला.तेथून निघून मग अँथ्रोपोलीजिकल म्युझियम अर्थात क्षेत्रीय मानव विज्ञान संग्रहालय पाहायला गेलो.अंदमान आणि निकोबार बेटांवर हजारो वर्षांपासून वास्तव्य करणार्‍या वनवासी जमातीच्या जीवनचक्राची तपशीलवार माहिती या म्युझियममध्ये प्रदर्शित केली आहे.नंतर सेल्युलर जेलनजीक असलेल्या कॉर्बिन कोव्ह बीचवर पोहोचलो.

शहाळ्याच्या पाण्याची चव चाखत बीचवर फेरफटका मारत असतानाच सूर्य मावळतीचे रंग उधळू लागला व पावलं हॉटेलच्या दिशेने वळली.तिसर्‍या दिवशी पहाटे हॅवलॉक आयलंडसाठी प्रस्थान केले.ग्रीन ओशन नावाच्या फेरी बोटमधून दोन तासांनी सुमारे ६७ किमी दूर असलेल्या हॅवलॉक आयलंडला पोहोचलो.हॅवलॉकचे प्रमुख आकर्षण म्हणजे राधानगर बीच! समुद्र स्नानाबरोबरच येथे स्कूबा डाइविंग, स्नॉर्केलिंग आदी अनेक गोष्टींचा आनंद लुटता येतो.येथील पांढर्‍या शुभ्र मुलायम वाळूच्या मऊशार स्पर्शाने अंग मोहरून गेलं.त्यानंतर अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशा काला पत्थर या बीचकडे प्रयाण केले.किनार्‍यावर उन्मळून पडलेले वृक्ष आणि दूरवर निळ्या पाण्याच्या छटा दिसत होत्या.हॅवलॉक मनसोक्त बघून झाल्यानंतर पोर्ट ब्लेअरवर परतण्यासाठी पुन्हा जेटीकडे निघालो.चौथ्या दिवशी मरिना पार्क येथील जेटीवरून प्रथम रॉस आयलंड व तेथून नॉर्थ बे आयलंडला भेट दिली.या जेटीच्या ठिकाणी त्सुनामी स्मारक उभारले आहे.

- Advertisement -

रॉस आयलंडवर आता ब्रिटिश अधिकार्‍यांचे बंगले, कार्यालयं,चर्च आदी ढासळलेल्या इमारतींचे भग्नावशेष उरले आहेत. त्या भग्नावशेषांमधून मोठ मोठी अक्राळ विक्राळ झाडे वाढली असल्यामुळे ती पाहताना भयावह वाटते. नॉर्थ बे आयलंडला काचेच्या बोटीतून समुद्रात असलेली प्रवाळांची बेटं (कोरल्स) आणि विविध प्रकारचे मासे जवळून पाहता आले.या दोन्ही बेटांवर मानवी वस्ती नाही.पुन्हा पोर्ट ब्लेयरला परतल्यानंतर प्रथम तेथील मत्सालय पहिले व नंतर सायन्स सेंटरला भेट दिली.ट्रिपचा पाचवा व शेवटचा दिवस खूपच व्यस्त होता.चॅथम येथील लाकूड कटाईची सॉ मिल,सामुद्रिका म्युझियम,वंडूर बीच व तेथील महात्मा गांधी मरिन नॅशनल पार्क, चिडिया टापूचे जैविक उद्यान पाहिले.

शेवटी पोर्ट ब्लेयरला गांधी पार्क येथे गेलो तेव्हा खूप अंधार पडला होता.शॉपिंगसाठी सरकारी एम्पोरियम सागरिकाला भेट दिली व अंदमानची आठवण म्हणून काही वस्तू खरेदी केल्या.खरं तर वर्षावनांनी पुरेपूर भरलेल्या अंदमानच्या विविध बेटांवरची हिरवीगार वनश्री, पांढर्‍या शुभ्र वाळूने सजलेले स्वच्छ व शांत समुद्रकिनारे, निरभ्र आकाशाचं प्रतिबिंब पडल्यामुळे निळेशार झालेले पाणी पाहायला दिवस खूपच कमी पडल्याची जाणीव होते.वीर सावरकर विमानतळावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीच्या स्मृती जागवत अंदमानच्या या अमाप सृष्टिसौंदर्याचा निरोप घेताना ही रुख रुख मनाला लागून राहिली.3

– प्रदीप शंकर मोरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -