Tuesday, December 3, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीGas Cylinder saving tips : गॅस सिलिंडर लवकर संपतो? मग वापरा...

Gas Cylinder saving tips : गॅस सिलिंडर लवकर संपतो? मग वापरा या ट्रिक्स

Subscribe

फार पूर्वी स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर केला जायचा. हळूहळू चुली नामशेष होऊन चुलीची जागा आता सिलिंडर गॅसने घेतली आहे. घरोघरी आता गॅस कनेक्शन पाहायला मिळत आहे. हे चित्र केवळ शहरापुरतचं मर्यादित राहिले नसून गावाकडेही महिला आता स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर करत आहेत. पण, दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या किंमतीही गगनाला भिडत आहेत. त्यामुळे महिन्याभराच्या आताच संपणारा गॅस सिलिंडर महिलांची डोकेदुखी ठरत आहे. तुमच्याही घरातील गॅस सिलिंडर लवकर संपतो का? मग ही बातमी शेवटपर्यत वाचा. आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या साहाय्याने तुम्ही गॅसची बचत करू शकाल.

या पद्धतीने करा गॅस सिलिंडरची बचत –

  • अनेकजण भांडी धुतल्यानंतर ओलीच भांडी स्वयंपाकासाठी वापरतात. ओली भांडी थेट गॅसच्या फ्लेमवर ठेवतात. पण, अशाने भांडे सुकण्यासाठी वेळ लागतो आणि त्यानंतर भांडे तापते. भांडे गरम झाल्यावर पदार्थ शिजतो. ज्यामुळे नकळत गॅस जास्त लागतो.
  • स्वयंपाक करण्यापूर्वी तयारी करूनच स्वयंपाकाला सुरूवात करावी. काहींना सवय असते भांड्यात तेल गरम करत ठेवतात. त्यानंतर भाजी कापली जाते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस वाया जातो.
  • लवकर गॅस संपत असेल तर गॅसची गळती होते का नाही ते चेक करून घ्या. कधी कधी नकळत सिलिंडरची गळती होत असते, जी आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे दर तीन महिन्यांनी गॅस पाइप आणि सिलिंडरची तपासणी करून घ्यावी.
  • मोकळ्या भांड्यात स्वयंपाक करण्याऐवजी प्रेशर कुकरचा वापर करावा. प्रेशर कुकरमध्ये पदार्थ कमी वेळात तयार होतो. ज्यामुळे स्वयंपाक तर लवकर तयार होतोच शिवाय गॅसची बचत होते.
  • पदार्थ शिजवताना त्यावर झाकण ठेवायला विसरू नका. झाकण ठेवून पदार्थ शिजवल्याने पदार्थ लवकर शिजते आणि गॅसची बचत होते.
  • जे पदार्थ साठवून राहू शकतात. असे पदार्थ एकदाच बनवून ठेवू शकता. ज्यामुळे असे पदार्थ बनवायला गॅसचा वापर पुन्हा पुन्हा होणार नाही आणि गॅसची बचत होईल.
  • स्वयंपाकासाठी नॉन स्टिक भांड्याचा वापर करावा. नॉनस्टिक भांड्यात जेवण लवकर शिजते आणि गॅसची बचत होते.
  • फ्रीजमधून काढून गॅसवर शिजण्यासाठी ठेवू नका. अशाने पदार्थ शिजण्यास वेळ लागतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, दुध फ्रीजमधून काढून गरम करण्यास ठेवू नये. अशाने दुध गरम होण्यास वेळ लागतो आणि गॅसही वाया जातो.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini