आधुनिक जीवनशैलीत झपाट्याने होत असलेल्या बदलांमुळे भारतीय तरुण आणि मुलांमध्ये मधुमेहाचे अर्थात डायबिटिजचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेहासारख्या गंभीर आजाराने जवळपास प्रत्येक वयोगटातील लोकांना ग्रासले आहे.जर लोकांनी आपल्या जीवनशैलीत आणि खाण्याच्या सवयींमध्ये वेळीच आवश्यक बदल केले नाहीत तर भविष्यात ही समस्या आणखी वाढू शकते. यासाठी वेळीच लक्षणे ओळखून त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आ आजच्या या लेखातून जाणून घेऊयात लहान मुले किंवा तरुणांमध्ये नेमक्या कोणत्या कारणांमुळे डायबिटीस होतो याविषयी.
तरुण वयात मधुमेह होण्याची कारणे
1. जेवणाच्या अनियमित वेळा :
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार,आजच्या पिढीतील बहुतेक तरुण आणि मुलांना वेळेवर उठणे किंवा वेळेवर जेवण घेणे आवडत नाही, अशा परिस्थितीत जर तुमची खाण्याची वेळ निश्चित नसेल तर मधुमेहासारख्या आजारांचा धोका वाढतो. खरंतर, जेव्हा आपण अवेळी अन्न खातो, म्हणजे रात्री उशिरा किंवा जेवणाची वेळ टळून गेल्यानंतर तेव्हा त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढण्याची शक्यता निर्माण होते. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका देखील वाढतो. मधुमेह टाळण्यासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण वेळेवर करणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमच्या शरीराला योग्य ते पोषण मिळते आणि रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.
2. जंक फूड :
तरुण आणि मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमुख कारण म्हणजे बाजारात मिळणारे जंक फूड. चिप्स, पॅक्ड फूड, बिस्किटे, चॉकलेट, पिझ्झा, बर्गर आणि नूडल्स यांसारख्या जंक फूडचे अतिसेवन आरोग्यासाठी विषापेक्षा कमी नाही. यामध्ये जास्त प्रमाणात साखर, फॅट्स आणि कॅलरीज असतात, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. निरोगी राहण्यासाठी आणि मधुमेह टाळण्यासाठी, आपण जंक फूडपासून दूर राहणे आणि फक्त घरी शिजवलेले निरोगी अन्न खाणे महत्वाचे आहे.
3. झोपेचे वेळापत्रक निश्चित नसणे :
सध्या लोकांच्या झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीची झोपेची आणि जागे होण्याची वेळ सेट केलेली नसते, तेव्हा झोप पूर्ण होत नाही, ज्यामुळे तणाव आणि चिंताग्रस्त समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे शरीराच्या इन्सुलिन-संबंधित प्रतिसादांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती योग्य प्रकारे होऊ शकत नाही. साखरेची पातळी यामुळे वाढू शकते. दीर्घकाळापर्यंत साखरेचे प्रमाण अनियमित राहिल्याने मधुमेह होण्याचा धोका निर्माण होतो.
4. व्यायाम न करणे :
गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये लठ्ठपणाची तक्रार झपाट्याने वाढत चालली आहे, त्यामुळे लोक व्यायामासाठी वेळ काढत नाहीत. वाढते वजन आणि लठ्ठपणा हे मधुमेहाचे प्रमुख कारण आहे. जे लोक नियमितपणे व्यायाम आणि योगासने करत नाहीत त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते.
5. अनुवांशिक :
लहान मुले आणि तरुणांमध्ये मधुमेह हा अनुवांशिक देखील असू शकतो. घरात जर कोणी डायबिटीसचा रुग्ण असेल उदाहरणार्थ आई किंवा वडील तर त्या पालकांकडून मुलांमध्येही मधुमेह होण्याचा धोका संभवतो.ज्या लोकांना त्यांच्या कुटुंबात मधुमेह आहे त्यांनी ते टाळण्यासाठी नियमित तपासणी करून घेतली पाहिजे आणि निरोगी जीवनशैली देखील पाळली पाहिजे.
हेही वाचा : Natural Room Freshener : नैसर्गिक गोष्टींनी बनवा रूम फ्रेशनर
Edited By – Tanvi Gundaye