दिवाळी येण्यापूर्वी एक महिना आधी घरात साफसफाईचं काम सुरू केलं जातं. घरात रंगकाम करण्यापासून ते एकेक वस्तू स्वच्छ करेपर्यंत बराच वेळ लागतो. यामुळेच अनेकांना दिवाळीच्या साफसफाईची चिंता वाटू लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना हे समजत नाही की साफसफाईची सुरुवात कुठून करावी.
जर तुम्हीदेखील साफसफाई करण्यापूर्वी या संभ्रमात असाल तर जाणून घेऊयात आजच्या या लेखातून नेमकं काय करावं याबद्दल. खरंतर या टिप्सच्या मदतीने केवळ साफसफाई करणे सोपे जाणार नाही तर तुम्हाला हेही समजेल की साफसफाईची सुरुवात कुठून करायला हवी .
सगळ्यात आधी करा हे काम :
दिवाळीच्या साफसफाईची सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात आधी घरातल्या त्या सामानाकडे लक्ष द्या ज्याची अजिबात गरज नाही. किंवा जे तुटलेले -फुटलेले असते. अशा सामानाला एकत्र करुन घ्या. यामुळे घरातली जागा रिकामी होऊ शकेल. सोबतच यांना साफ करण्याचं कामदेखील होऊन जाईल.
इथून करा सुरुवात :
आता दिवाळीत वर्षभराची साफसफाई करण्यासाठी सगळ्यात आधी सीलिंग फॅन आणि खिडकीदरवाजे यांची साफसफाई करण्याला सुरुवात करा. यासोबतच घराच्या भिंतींना लागलेली कोळीष्टकं आणि घाणदेखील चांगल्यारीतीने साफ करा. असं केल्याने या जागांवर लागलेली धूळ एकदाच धूळ फरशीवर पडते. त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा फरशी साफ करावी लागत नाही.
किचन क्लिनिंग :
स्वयंपाकघराचा वापर तुम्हाला सकाळ- संध्याकाळ स्वयंपाक तयार करण्यासाठी करावा लागतो. यासाठीच दिवाळीत याची साफसफाई लवकर करुन घ्यायला हवी. अशात तुम्ही स्वयंपाक घराच्या साफसफाईसाठी ब्लिचिंग पावडर आणि डिटर्जंटचा वापर करु शकता. यामुळे किचन टाईल्स आणि प्लॅटफॉर्म सहजतेने चमकू शकतात. हवे असल्यास तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगरदेखील वापरु शकता.
घरातील भांडी आणि सामान करा स्वच्छ :
स्वयंपाकघराच्या सफाईनंतर तुम्ही काचेच्या भांड्यांना अगदी काळजीपूर्वक साफ करुन घ्या. यांना गरम पाणी किंवा डिटर्जंटमध्ये थोडेसे मीठ घालून तुम्ही स्वच्छ करू शकता. या मिश्रणात एकेक काचेचे भांडे घालून त्याला आरामात विसळून काढा. अशाचप्रकारे घरात ठेवलेल्या बाकीच्या सामानालाही स्वच्छ करुन घ्या.
बेडरुम आणि लिव्हिंग रुमची स्वच्छता करा :
सर्वात शेवटी तुम्ही बेडरुमसोबतच लिव्हिंग रुमची स्वच्छता करुन घ्या. इथे तुम्ही बेडरुमची बेडशीट आणि पडदे बदला. लिव्हिंग रुममधील सोफ्याचे कव्हर बदला. आणि डेकोरेटिव्ह व शोभेच्या वस्तूंना स्वच्छ करुन घ्या. यासोबतच फरशीही साफ करा.
Edited By – Tanvi Gundaye