आत्मविश्वास हा आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहचविण्यासाठी सर्वात महत्वाची असणारी गोष्ट आहे. जर एखाद्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तो जीवनात येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला सहज सामोरे जाऊ शकतो. यासाठी आत्मविश्वास लहानपणापासूनच असणे महत्वाचे आहे. त्यामुळे मुलांचे संगोपन करताना मुलांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे पालकांचे कर्तव्य आहे.
मुलांना लहानपणापासूनच काही गोष्टी शिकविल्या तर त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालकांनी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊयात,
आत्मविश्वास वाढविण्यासाठी करा या गोष्टी (Do these things for boost confidence in child)
- मुलांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन द्या. अशाने मुलांमध्ये स्वतःवरील विश्वास दृढ होईल. खरं तर, जेव्हा आई-वडील मुलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात. तेव्हा ही गोष्ट मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतो.
- काही पालकांना अशी सवय असते की, ते मुलांना घरकामापासून दूर ठेवतात. घरातील कामे दिल्याने मुलांचे अभ्यासापासून दुर्लक्ष होईल असे त्यांचे म्हणणे असते. पण, प्रत्यक्षात जेव्हा मुलांना घरातील छोट्या- छोट्या कामांचा भाग बनविला जातो. तेव्हा मुलांचा उत्साह वाढतो. उदाहरण द्यायचे झाले तर मुलांना जेवणानंतर स्वतःची प्लेट सिंकमध्ये ठेवणे, स्वतःचे कपडे व्यवस्थित ठेवणे अशा सवयी लावायला हव्यात. या कामांमुळे मूल स्वावलंबी बनते आणि मुलांचा स्वतःवरील आत्मविश्वास वाढतो.
- मुलं चुकांमधून शिकतात. त्यामुळे त्यांना चुका करू द्या. मुलांनी चूक केल्यास त्याला ओरडण्या-मारण्याऐवजी समजावून सांगा. तो कुठे चुकला आहे, कसा चुकला आहे ते समजावून सांगा. अशाने तो पुढच्यावेळी अधिक लक्ष देऊन काम करेल. ही गोष्ट सुद्धा मुलांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत करेल.
- मुलांना लहानपणापासूनच जिंकण्यासोबतच हारण्याचे महत्वही शिकवायला हवे. एखादी गोष्ट करताना तुमचे पाल्य दहा वेळ जरी चुकले तरी त्याला पुन्हा प्रयन्त करण्यास शिकवा.
- मुलांची अतिकाळजी करू नका. मुलांची अति काळजी काही करणे हे देखील एक प्रकारे मुलाच्या विकासासाठी अडचणीचे कारण बनू शकते. मुलांना आव्हानांना सामोरे जाऊ द्या. मुलांवर लक्ष अवश्य ठेवा, पण काही गोष्टी त्याला स्वतःच करण्यास शिकू द्या.
- मुलांना त्याच्या आयुष्यतील रोजच्या छोट्या -छोट्या अडचणी स्वतःच सोडवू द्या. अशाने ते आत्मनिर्भर होतील. गरज भासली तरच मदत करा.
- मुलांचा कोणतीही गोष्ट, आव्हान पॉझिटिव्हली घ्यायला शिकवा, पालकांचे हे पहिले काम आहे. आपण हे करू शकतो, हे सर्वप्रथम मुलांच्या मनावर बिंबवा.
हेही पहा : Parenting Tips : मुलांसाठी पाळणाघर निवडताना घ्या ही काळजी
Edited By – Chaitali Shinde