अलीकडे अनेक महिला आपल्या त्वचेसंबंधित समस्यांचा सामना करताना दिसतात. सर्वच महिलांना आपला चेहरा नेहमी चमकदार आणि सुंदर दिसावा अशी अपेक्षा असते. यासाठी महिला बाजारातील विविध प्रोडक्ट्सचा वापर देखील करतात. मात्र, बाजारातील महागडे केमिकलयुक्त प्रोडक्ट्स काही मर्यादीत काळापर्यंतच चेहरा सुंदर ठेवण्यास मदत करतात शिवाय या प्रोडक्ट्सचा अधिक वापर चेहऱ्यासाठी घातक ठरु शकतो. अशावेळी तुम्ही भारतीय आयुर्वेदात सांगितलेले आयुर्वेदिक फेसपॅक नक्की ट्राय करु शकता.
भारतीय आयुर्वेदामध्ये त्वचा, केस, विविध आजार यांच्यावर घराच्या घरी करता येणारे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदामध्ये सर्वगुणसंपन्न मानल्या जाणाऱ्या तुळशीचा फेसपॅक म्हणून कसा वापर करता येईल हे सांगणार आहोत.
तुळशीचे ‘हे’ 3 फेसपॅक नक्की ट्राय करा
-
तुळस आणि कडुलिंबाचा फेसपॅक
आयुर्वेदामध्ये ज्याप्रमाणे तुळशीला महत्त्वपूर्ण मानलं जातं. त्याचप्रमाणे कडुलिंबाच्या पानांना देखील खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. या दोन पानांचे मिश्रण करून फेसपॅक बनवल्यास चेहऱ्यावरील बॅक्टेरियाची वाढ थांबते ज्यामुळे पिंपल्स येत नाहीत. यासाठी 1 वाटी कडुलिंब आणि 1 वाटी तुळशीची पाने घेऊन त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. 20-25 मिनिटांनी चेहरा धुवा.
-
तुळस आणि दह्याचा फेसपॅक
चेहऱ्यावरील धूळ, घाण, सनटॅन, काळपटपणा कमी करण्यासाठी तुम्ही तुळस आणि दह्याचा फेसपॅक वापरु शकता. मात्र, त्यासाठी तुळशीच्या कोरड्या पानांची पावडर तयार करा. फेसपॅक तयार करताना 2 चमचे तुळशीचे पाने आणि त्यात एक चमचा दही मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटांनी चेहरा धुवा.
-
तुळस आणि कोरफडीचा फेसपॅक
चेहऱ्यावर खूप मुरुम झाल्यास तुम्ही तुळस आणि कोरफडीचा फेसपॅक लावू शकता. त्यासाठी तुळशीच्या पानांमध्ये 2 चमचे कोरफड जेल घाला आणि मिक्स करुन हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा. साधारण 20-25 मिनिटांनी चेहरा धुवा.