डॉ. जानकी अम्मल या भारतातील पहिल्या वनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म भारतात अशा वेळी झाला जेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते आणि जातीभेद मोठ्या प्रमाणात होता. त्या थिया समुदायाच्या म्हणजे त्या काळात मागासलेल्या समुदायापैकी होत्या. जानकी अम्मल यांनाही त्यांच्या सहकाऱ्यांकडून भेदभाव आणि एकटी महिला असल्याने छळ सहन करावा लागला. मात्र, त्या कधीही मागे हटल्या नाहीत आणि त्यांच्या काळातील सर्वात प्रमुख शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून नावरूपाला आल्या.
डॉ. जानकी अम्मल यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1897 रोजी केरळमधील थेलासरी येथे झाला. लहान जानकी तिच्या आई, वडील, सहा भाऊ आणि पाच बहिणींसोबत थेलासेरी येथील समुद्राजवळील ‘एडाथिल हाऊस’ मध्ये राहत होती. अशा समाजात वाढली जिथे महिलांना त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र तिला आणि तिच्या कुटुंबातील महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात होते, जी त्या काळात एक दुर्मीळ गोष्ट होती.
थेलासरी येथे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर, अम्मल उच्च शिक्षणासाठी मद्रासला गेल्या. मद्रासमध्ये, त्यांनी क्विन मेरी कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आणि 1921 मध्ये चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून ऑनर्स पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी महिला ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवले. या काळात त्यांना अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित बार्बर स्कॉलरशिप देखील मिळाली. जानकी अम्मल त्या काळात मिशिगन विद्यापीठाने डी.एससी (पीएचडीच्या समतुल्य पदवी) प्रदान केलेल्या काही आशियाई महिलांपैकी एक होत्या . येत्या काळात त्यांच्या कारकिर्दीला आकार आला आणि त्या वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून भारतात परतल्या.
त्यांच्या संशोधनाबद्दल बोलायचे झाल्यास ऊस, वांगी आणि मॅग्नोलियाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती त्यांनी विकसित केल्या. संकरित प्रजननासाठी वनस्पतींची निवड करण्यासाठी त्यांच्या गुणसूत्र संख्यांचाही अभ्यास त्यांनी केला. या अभ्यास शाखेला सायटोजेनेटिक्स म्हटले जाते. त्यांनी सीडी डार्लिंग्टन या सहकाऱ्यासोबत ‘क्रोमोसोम अॅटलास ऑफ कल्टिव्हेटेड प्लांट्स’या पुस्तकाचे सह-लेखनही केले . स्वतंत्र भारतात विज्ञानाला चालना देण्यासाठी त्यांनी विविध पदांवर सरकारी सेवेत काम केले. त्यांनी अलाहाबाद येथील केंद्रीय वनस्पती प्रयोगशाळेचे प्रमुखपद भूषवले.
एक अव्वल शास्त्रज्ञ असूनही, अम्मल त्यांचे आयुष्य अतिशय साधेपणाने जगल्या. त्यांचा गांधीवादी विचारांवर विश्वास होता. त्या नेहमीच त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात खूप शांत आणि संयमी राहिल्या आहेत. त्या म्हणत असत, “माझे काम ही एकमेव गोष्ट आहे जी टिकेल”.
हेही वाचा : Holi 2025 : सेफ होळीसाठी मुलांना शिकवा या सेफ्टी टिप्स
Edited By – Tanvi Gundaye