कमला सोहोनी यांचा जन्म मध्य प्रदेश येथील इंदोर शहरात 14 सप्टेंबर 1912 मध्ये झाला. सुप्रसिद्ध लेखिका विदुषी दुर्गा भागवत या त्यांची सख्खी बहीण. कमला यांनी बी.एस्सी.ला सेंट झेवियर्स महाविद्यालयातून, रसायनशास्त्र आणि भौतिकी विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवली. विज्ञान विषयातच मूलभूत संशोधन करायचं असं मनाशी पक्कं ठरवलेल्या कमलाबाईंना बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून एम. एस्सीची पदवी हवी होती. तिथे रसायनशास्त्र विषयासाठी प्रवेश घेण्याची त्यांची इच्छा होती. संस्थेच्या सर्व निकषांनुसार त्या प्रवेश घेण्यासाठी पात्र होत्या मात्र संस्थेचे प्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांनी ‘मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही’ असे कमलाबाईंना कळवले. पण निश्चयाच्या पक्क्या असल्याने कमलाबाईंनी सत्याग्रह करेन पण येथेच प्रवेश घेईन असा तगादा लावल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला. मात्र काही अटी घालून!
कमलाबाईंनी प्राध्यापक श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं संशोधन सुरू ठेवलं. दूध-डाळी-शेंगा यातून मिळणार्या प्रथिनांवर त्यांचं संशोधन बेतलेलं होतं. त्या संशोधनाची गुणवत्ता पाहून रामन यांनी आपला पूर्वनिर्णय बदलला आणि 1936 पासून विद्यार्थिनींना प्रवेश देण्यास सुरुवात केली.
1937 मध्ये कमलाबाईंना केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. डेरेक रिख्टर यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेडरिक हॉपकिन्स लॅबोरेटरीत संशोधन करण्याची संधी मिळाली. पण रिख्टर मध्येच विद्यापीठ सोडून गेले आणि डॉ. रॉबिन हिल यांच्या मार्गदर्शनाखाली कमलाबाईंचं संशोधन सुरू झालं. त्यांनी बटाट्यावर संशोधन सुरू ठेवलं आणि बटाट्यातील ‘सायटोक्रोम सी’ या जैविक उत्प्रेरकाचा शोध त्यांना लागला. अवघ्या 14 महिन्यांत त्यांचं संशोधन पूर्ण झालं आणि त्यांना डॉक्टरेट मिळाली.
पुढे एम. व्ही. सोहोनी यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या मुंबईत आल्या. मुंबईत रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये त्या बायोकेमिस्ट्रच्या प्राध्यापक बनल्या. तिथे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत चार खाद्यपदार्थांवर लक्ष केंद्रित केलं. त्यापैकीच एक होता ताडगोळा. राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांच्या उत्तेजनामुळे त्यांनी नीरेचा जास्त अभ्यास केला.ताडगोळ्यातील पोषक घटकांमुळे स्त्रिया आणि कुपोषित बालके यांच्यामध्ये नीरा, नीरेपासून काकवी व गुळाचे उत्पादन करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. या संशोधनाची दखल सरकारी पातळीवर घेतली गेली आणि कमलाबाईंना राष्ट्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
आपल्या कारकीर्दीत एम.एस्सी व पीएच्.डीच्या पंचवीस विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शन घेतले व त्यांनी एकशे पंचावन्न शोधनिबंध लिहिले. निवृत्तीनंतर त्यांनी स्वयंपाकघरातील खाद्यपदार्थांवर संशोधन करून अनेक लेख लिहिले. त्या लेखांचे संकलन करून ‘आहार-गाथा’ या नावाने एक पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले. 1998 साली त्यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका कार्यक्रमात नवी दिल्लीत एका सत्कार समारंभातच त्या कोसळल्या आणि काही दिवसातच त्या निवर्तल्या. नीराच्या माध्यमातून त्यांचं संशोधन आजही अजरामर आहे.
हेही वाचा : Parenting Tips : एक्झाम एंझायटी पासून मुलांना असे ठेवा दूर
Edited By – Tanvi Gundaye