Wednesday, March 19, 2025
HomeमानिनीDr. Mangala Narlikar : प्रख्यात गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर

Dr. Mangala Narlikar : प्रख्यात गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर

Subscribe

गणित म्हणजे अक्षरश: मुलांची घाबरगुंडी उडवणारा किचकट विषय. गणित म्हटलं की पोटात कळ येऊ लागते. पण याच गणिताला आपला मित्र बनवून लहान विद्यार्थ्यांमध्येही गणिताची आवड निर्माण करण्याचे काम केले ते डॉ. मंगला जयंत नारळीकर यांनी. पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे यांचा जन्म 17 मे 1943 मधला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून 1962 साली गणित विषयातून बीएची पदवी मिळवली. त्यानंतर 1964 मध्ये गणितातच एम. ए.ची पदवी त्यांनी मिळवली. या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. याकरता त्यांना सुवर्णपदकही मिळाले. 1965 मध्ये त्यांचा विवाह सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी झाला.

त्या टिआयएफआर या संस्थेत गणित विद्यालयात सहायक संशोधक व त्यानंतर सहयोगी संशोधक म्हणून काम पाहत होत्या.1981 मध्ये मंगलाताईंनी विश्लेषणात्मक संख्या सिद्धांतावर संशोधन प्रबंध सादर करून मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट संपादन केली. 1989 च्या दरम्यान त्यांनी आणि जयंत नारळीकर यांनी मिळून ‘आयुका’या अंतराळशास्त्रातील संशोधनाला चालना देणाऱ्या संस्थेची स्थापना केली.

Dr. Mangala Narlikar: Eminent Mathematician Dr. Mangala Narlikar

डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत. लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. शालेय विद्यार्थ्यांसाठीचे गणिताच्या सोप्या वाटा, गणिती गप्पा, नभात हसरे तारे, पहिलेले देश, भेटलेली माणसं हे प्रवासवर्णन यासारखी त्यांची पुस्तकं विशेष गाजली. त्यांनी काही वर्षे ‘बालभारती’मध्ये देखील गणिताच्या पाठ्यपुस्तक मंडळावर काम केले. लहान मुलांची गणिताची पुस्तकं अधिक सोपी आणि आकर्षक व्हावीत, त्यांच्यात गणिताची आवड वाढीस लागावी यावर त्यांचा भर होता.

वयाच्या 43 व्या वर्षी मंगलाजींना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने हुलकावणी दिली होती. केमोथेरपी, रेडीएशन आणि पोटात घेण्याच्या गोळ्या असे उपाय सुरू होते. कोणतेही गणित हे अचूक पायऱ्या पार पाडून सोडवलं तरच सुटतं हे त्यांना पक्कं माहित होतं. म्हणूनच की काय, कर्करोग झाल्यानंतर त्यांना अनेकांनी विविध सल्ले दिले तरीदेखील कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता आधुनिक विज्ञानाच्या आधारे त्या आपलं कर्तव्य पार पाडत राहिल्या. सर्व वैद्यकीय उपचारांमुळे जवळपास 33 वर्षे त्या निरोगी राहिल्या. मात्र दुसऱ्यांदा झालेल्या कर्करोगाशी दोन हात करताना त्यांचे 17 जुलै 2023 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.

हेही वाचा : Chickpeas Benefits :भिजवलेले की उकडलेले कडधान्य खाणे फायदेशीर?


Edited By – Tanvi Gundaye

 

Manini