घरनवरात्रौत्सव 2022डिजिटल युगातही मातीच्या पणतीचं स्थान अबाधित

डिजिटल युगातही मातीच्या पणतीचं स्थान अबाधित

Subscribe

हल्ली सुटसुटीतपणाच्या नावाखाली काही घरांमध्ये दिव्यांची किंवा मातीच्या पणतीची जागा मेणबत्ती आणि डिजिटल दिव्यांनी घेतली आहे.

मुंबई : दिवे लागले रे दिवे लागले,तमाच्या तळाशी दिवे लागले…भारतीय संस्कृतीमधील सर्वांत महत्त्वाचा, विविध पैलूंनी नटलेला सण म्हणजे दीपावली. दसरा झाला की सर्वांना वेध लागतात ते दीपावलीचे. दिवाळी म्हटलं की फराळ, कंदील, सुबक रांगोळी, मिठाई, अभ्यंग स्नान, उटणं, पूजा, रोषणाई, दिवे या सगळ्यांचाच समावेश होतो. सर्वत्र दिवाळीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. मागील दोन वर्षांची कसर यंदाच्या दिवाळीत भरून काढण्यात येत आहे. काळ जसा बदलतो, त्याप्रमाणे सण उत्सव साजरे करण्याची पद्धत सुद्धा बदलते. कालपरत्वे होणारे हे बदल सर्वत्रच दिसून येतात.
भारतीय संस्कृतीत सणांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. भारतीय संस्कृतीत ऋतूबदलानुसार सणाची रचना केलेली आहे आणि त्यानुसार सण साजरे केले गेले तर त्यातून आपली परंपरा सुद्धा जपली जाते. दीपावलीचा सण सुद्धा त्याला अपवाद नाही. दीपोत्सव म्हणजेच दिवाळी साजरे करताना तेलाचे दिवे लावण्याची परंपरा आहे. दीपावली हा सण मूळात दिव्यांचा. त्यामुळे या सणात सर्वांत जास्त महत्व असतं ते दिव्यांना. हल्लीच्या जलद आणि डिजिटल युगात सर्वच गोष्टी आणि सण साजरे करण्याची पद्धत सुद्धा बदलत आहे. तेजाच्या आणि प्रकाशाच्या या सणाचं सध्या काही प्रमाणात स्वरूप बदलत आहे. हल्ली सुटसुटीतपणाच्या नावाखाली काही घरांमध्ये दिव्यांची किंवा मातीच्या पणतीची जागा मेणबत्ती आणि डिजिटल दिव्यांनी घेतली आहे. त्यातच आता मातीच्या पणत्याबरोबर चिनी मातीच्या डिझायनर पणत्या देखील बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. तरीही चिनी मातीच्या पणत्यांऐवजी पांरपरिक मातीच्या पणत्या घेण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. मातीच्या पणत्या ३० ते ५० रुपये डझन तर चिनी मातीच्या पणत्या ५० ते ७० रुपये डझन आहेत. याशिवाय डेकोरेटिव्ह पणत्याही बाजारात ५० रुपयांपासून उपलब्ध आहेत.

धारावीच्या कुंभारवाडा गजबजला

- Advertisement -

खरेतर मार्केटच्या दृष्टीने विचार केला तर दिवाळीसाठी ज्या वस्तू लागतात त्यांची मोठी बाजारपेठ असते. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल सुद्धा होत असते. त्यात सजावटीच्या वस्तू, फटाके, कंदील यांच्यासोबतच पणत्यांचा देखील समावेश होतो. या पणत्यांची बाजारपेठ सुद्धा खूप मोठी आहे. मुंबईमधील धारावीत लहान-मोठे सर्वच व्यवसाय आहेत. पण धारावीत असेल्या कुंभारवाड्याचे खरे महत्त्व अधोरेखित होते, ते दिवाळीच्या दिवसांमध्ये. या कुंभारवाड्यात लहान – मोठ्या आकाराच्या सुबक नक्षीच्या पणत्या बनविल्या जातात. मातीच्या साध्या पणत्या तर असतातच, पण उत्तम नक्षीकाम आणि सजावट केलेल्याही पणत्या या कुंभारवाड्यात उपलब्ध आहेत. आताही हा कुंभारवाडा गजबजलेला आहे.

Diwali 2022

- Advertisement -

माती महागली

धारावीतल्या कुंभारवाड्यात बनविलेल्या या मातीच्या पणत्या केवळ मुंबई-महाराष्ट्र आणि देशभरातच नव्हे तर परदेशातही पाठविल्या जातात. या पणत्या बनविण्यासाठी ज्या मातीचा वापर केला जातो ती माती गुजरात राज्यातून आणली धारावीतील कुंभारवाड्यात आणली जाते. दरवर्षी गुजरातवरून येणारी माती आणि पणती यांच्या किमतीत १० तर १२ टक्क्यांची वाढ होते.

मातीच्या कंदिलाचे आकर्षण

कुंभारावाडा हा फक्त पणतीसाठीच नाही तर, इतर मातीच्या वस्तूंसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. वर्षभर इथे मातीच्या वस्तू बनविण्याचं काम सुरू असतं. पण दिवाळीच्या दिवसांत या कुंभारावड्याला वेगळंच तेज येत. येथे बनणारे मातीचे कंदील देखील अनेकांचे लक्ष वेधून घेतात. कागदी किंवा प्लास्टीकच्या कंदिलांना जशी मागणी असते तशी मागणी मातीच्या कंदिलांनाही आहे. काही घरांमध्ये पणती आणि दिव्यांची जागा मेणबत्ती आणि डिजिटल दिव्यांनी घेतली आहे. पण अजूनही काही हौशी घरांमध्ये लहान मुलांना मातीचे दिवे घेऊन रंगविण्यासाठी घेऊन दिले जाते. यामुळे लहान मुलं सुद्धा रमतात. पणती रंगविणे यामुळे शाळेच्या जुन्या दिवसांची आठवण झाल्यावाचून राहत नाही.

दीपावलीत दिवे लावून आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करतो, त्याचप्रमाणे आपण आपलं आयुष्य सुद्धा प्रकाशमान केलं पाहिजे, हाच संदेश आपल्याला यातून मिळतो. वेगवेळ्या पद्धतीचे दिवे, डिजिटल दिवे किंवा अगदी मेणबत्तीचा जरी वापर केला जात असला तरीही मातीच्या पणतीचं स्थान मात्र आजही अबाधित आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -