बऱ्याचवेळा मुलं जेवण्याचा कंटाळा करतात. अशावेळी मुलांना खाऊ घालणं हा पालकांसाठी मोठा टास्क होऊन जातो. कारण मुलांच्या आरोग्यासाठी अन्न गरजेचे आहे. यामुळे मुलांनी खावे यासाठी पालक वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यासाठी मग कधी मुलांना टिव्ही दाखवत भरवले जाते. टीव्ही बघण्याच्या नादात मुलंही मग जे तोंडात कोंबल जातयं ते खात राहतात. तर कधी मुलं नको म्हणत असताना त्यांच्यामागे तासभर फिरत त्यांच्या तोंडात अन्न कोंबले जाते.
खरं तर या प्रकारात मुलांना आपण काय खातोय किती खातोय हे देखील कळत नाही. तर दुसरीकडे काही पालक मुलांना भीती दाखवत, धाकदपटशा दाखवत जेवायला घालतात. विशेष म्हणजे मुलांवर एवढे सगळे प्रयोग करुन झाल्यावर मुलांना जेवू घातल्याचे समाधान पालकांना मिळते. पण मुलाने ते किती आवडीने खाल्लं आहे याचा विचार पालक करत नाहीत. कारण पालक हा सगळा खटाटोप मुलांनी खावे यासाठी करतात. त्यामागे त्यांची प्रेमापोटी असलेली माया जरी असली तरी शास्त्रीयदृष्ट्या मुलांना इच्छा नसताना जबरदस्तीने खाऊ घालणे किंवा खाण्याची सक्ती करणे हे शिक्षा केल्यासाऱखेच आहे. कारण पालकांच्या या वृत्तीचा मुलांवर नकारात्मक परिणाम होतो.
नकारात्मक भावना
जेव्हा तुम्ही मुलाला जबरदस्तीने खायला घालता तेव्हा मुलांनी ते अन्न फक्त खाल्लेलं किंवा गिळलेलं असतं. अन्नाचा स्वाद आणि आनंद त्यांनी घेतलेलाच नसतो. त्यामुळे अनेक वेळा त्यांना पूर्ण पोषण मिळत नाही. कोणत्या पदार्थाची चव काय हे देखील त्यांना कळत नाही. यामुळे पालकांच्या सक्तीमुळे आवडत नसलेले पदार्थही त्यांना खावे लागतात. त्यामुळे मुलांना जेवणाबदद्ल आसक्ती राहत नाही.
भुकेवर नियंत्रण
जेव्हा मुलांना भूक लागते तेव्हा ते रडतात किंवा स्वतःच खाण्यास मागतात. हा गुण मुलांमध्ये जन्मजात असतो. नवजात बाळही रडते आणि भूक लागल्यावर दूध मागते. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या वेळापत्रकानुसार जबरदस्तीने आहार देता तेव्हा त्याच्या नैसर्गिक प्रणालीवर परिणाम होतो. त्यातून त्याला विकारही होऊ शकतात.
जेवणाबदद्ल राग
कुटुंबासाठी जेवणाची वेळ खूप महत्त्वाची असते. कारण यावेळी, कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि जेवणाचा आनंद घेत दिवसाच्या गोष्टी शेअर करतात. पण मुलांच्या बाबतीत मात्र वेगळं घडतं. जेवण हे त्यांच्यासाठी रेड सिग्नल सारखे होते. आता आपल्यावर जबरदस्ती होणार. नाईलाजाने खावे लागणार. असा विचार मुलांच्या मनात आकार घेऊ लागतो. त्यातून मग पालकांबद्दल, जेवणाबद्दल त्यांच्या मनात राग निर्माण होतो.
मानसिक आरोग्य
बऱ्याचवेळा पालक त्यांना आवडणारा पदार्थ मुलांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी मुलं तो पदार्थ आनंदाने नाही तर नाईलाजाने खातात. अशी सक्ती करणे मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक असते. पालकांच्या या वर्तणुकीमुळे मुलांचा खाण्यातला इंटरेस्ट कमी होऊ लागतो.
आत्मविश्वास गमावतो
जेव्हा मुलांना त्यांच्या पालकांच्या दबावाखाली सतत खाण्याची सक्ती केली जाते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. त्यांच्या भावनांचा कोणी आदर करत नाही, असे त्यांना वाटते. यामुळे मुलांनाही खूप वाईट वाटते. त्यामुळे पालकांनी मुलांवर जेवणाची सक्ती कधीही करू नये. जेव्हा भूक लागते तेव्हा मुलं स्वतः हून सांगेल तेव्हाच त्याला खाण्यास द्यावे.
श्वास कोंडणे
बऱ्याचवेळा मूलं जेवण नको म्हणून रडत असते पण पालक त्याला खावू घालण्याची जबरदस्ती करत असतात. अशावेळी तो रडत असताना तुम्ही त्याच्या तोंडात घास भरवला तर चुकून अन्न श्वासनलिकेत जाण्याचाही धोका असतो. त्यामुळे मुलाला गुदमरते.पण लहान असल्याने ते सांगू शकत नाही. यामुळे पालकांनी मुलांना कधीही जबरदस्तीने अन्न भरवू नये. उलट खाण्याप्रती मुलाला आवड निर्माण होईल अशा य़ुक्त्या वापराव्यात.