चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवसाने मराठी नववर्षाची खरी सुरुवात होते. हिंदू कालदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो. यंदा 9 एप्रिल 2024 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या जल्लोषात हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते. पारंपरिक मराठमोळी वेषभूषा, दागदागिने परिधान करत घरोघरी गुढी उभारत, गोडाधोडाचा स्वयंपाक करत नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची पाने देखील खाल्ली जातात. आपले पूर्वज म्हणायचे की, जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी, म्हणूनच आपल्याकडे गुढीपाडव्याच्या दिवशी गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवींचा समावेश केलेला आहे.
श्रीखंडाचा इतिहास
आयुर्वेदात श्रीखंडाला “रसाला” किंवा “शिखरिणी” असे म्हणतात. श्रीखंडा मागे एक पौराणिक कथेची जोड सुद्धा आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा पदार्थ सर्वप्रथम त्याने तयार केला. या पदार्थाच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन कार्यात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ ‘श्रीखंड’ म्हणून ओळखला जातो.
गुढी पाडव्याला श्रीखंड का खावे?
उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना शरीरात थकवा येऊ नये, शरीरात शक्ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे एका रसायना प्रमाणे काम करते. म्हणजेच उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्याचे शरीर अगदी कमजोर झाले आहे, ज्यांच्यात अजिबात उत्साह नाही, ज्यांना शरीरात ताकद हवी असेल त्यांच्यासाठी श्रीखंड खाणं अतिशय उत्तम आहे.