शरीर निरोगी ठेवण्यासाठी ताजे आणि पौष्टिक अन्नपदार्थ खाणे आवश्यक आहे. आपण जे काही खातो त्याने शरीराची भूक भागते, तहानही भागते. खाण्या-पिण्याचा शरीरावर दिर्घ परिणाम होतो. कदाचित तुम्हाला हे ठाऊक नसेल की, खाण्यापिण्याचा केवळ शरीरावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. आपण काय प्यायले आहोत, कोणते पदार्थांचे सेवन केले आहे, यामुळे तुमचा मूड बदलतो. थोडे आश्चर्य वाटेल ऐकून पण, हे खरं आहे.. मानवाच्या मानसिक भावना जसे की, आनंद, समाधान यांचा खाण्यापिण्याशी जवळचा संबंध आहे. तुम्हाला स्वत: ला असा अनुभव आला असेल की, तुम्ही तुमचा आवडता पदार्थ खाल्यानंतर मूड सुधारला आहे. पण, असे का घडते ?
खरं तर, काही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स तुमचे मानसिक आरोग्य उत्तमरित्या ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, अंड्यातील पिवळे बलक. यात असणारे व्हिटॅमिन डी तुमचा मूड सुधारतो आणि डिप्रेशनची समस्या दूर होते. याशिवाय तुम्ही पालक, बदाम, डार्क चॉकलेट खायला हवे. या पदार्थांमध्ये मॅग्नेशियम आढळते, ज्यामुळे नर्व सिस्टम शांत होते आणि मूड चांगला राहतो. काही पदार्थ असेही आहेत, ज्यामुळे हॅपी हार्मोन्सचे उत्पादन वाढण्यास मदत होते. सेरोटोनिन हार्मोन्सचा बराचसा भाग हा पोटात तयार होतो. त्यामुळे या हार्मोन्सचे उत्पादन वाढवण्यासाठी केळी, धान्ये यांचा आहारात समावेश करायला हवा.
पोटाचा आणि मूडचा आहे संबंध –
तुम्हाला कदाचित हे ठाऊक नसेल की, आतडे आणि मेंदूचे आरोग्य यांचा खोलवर संबंध आहे. जेव्हा आतडे म्हणजेच पोटाचे आरोग्य उत्तम राहते, तेव्हा तुमचा मूडही चांगला राहतो. पण, जेव्हा तुमचे पोट बिघडते, पोटात गॅस होतो तेव्हा तुमचा मूड खराब असतो. त्यामुळे पोटाचे आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे, कारण याचा थेट परिणाम मूडवर होतो. पोटाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दही आणि आंबवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde