आजकाल अनेकजण मानसिक आरोग्यासंबंधी चिंतेत असतात. वाढत्या ताणतणावांमुळे मानसिक आरोग्य बिघडते. काही वाईट सवयींचादेखील मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
1) नकारात्मक मानसिकता
जर आपले विचार नकारात्मक असतील तर त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर सुद्धा होतो. सारखं नकारात्मक बोलणे, वागणे, अपयश आल्यामुळे पुन्हा अपयशी होऊ अशी भावना निर्माण होणे. अनेक गुंतागुंतीचे विचार मनात येणे यामुळे आपण इतके नकारात्मक होतो की मानसिक आरोग्य बिघडते.
2 ) इतरांशी तुलना करणे
वाढत्या सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तसेच मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांशी संपर्कात राहण्यासाठी आपण सोशल मीडियाचा जास्त उपयोग करतो. पण जेव्हा ते काही त्याचे आनंदी क्षण सोशल मीडियावर शेअर करतात. तेव्हा त्यांचं आयुष्य किती सुंदर, आनंदी आहे. आपल्या आयुष्यात किती दुःख आहे अशी तुलनेची भावना निर्माण होते. या भावनेमुळे आपणच या तणावाचं कारण बनतो.
3 ) दीर्घकाळ घरात राहणे
जर दीर्घकाळ घरात राहिलो तर आपल्यालाच कुठे जायची इच्छा होत नाही. त्यामुळे आपलं मन देखील उदास, बेचैन राहतं. जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. दीर्घकाळ घरात राहिल्यामुळे उत्साह निघून जातो. आळशी बनतो. कोणतेही काम उत्साहाने किंंवा जोशाने करावंसं वाटत नाही.
4 ) पुरेशी झोप न घेणे
कमीतकमी ८ तासांची झोप आपल्या शरीरासाठी तसेच मानसिक आरोग्यासाठी देखील गरजेची आहे. पुरेशी झोप झाली नाही तर आपला पुढचा दिनक्रम देखील बदलतो. त्यामुळे अजून ताण निर्माण होतो. याचा परिणाम शरीरावर तर होतोच पण मानसिक आरोग्यावर देखील होतो.
5 ) धूम्रपान / मद्यपान
काही जण तणाव कमी करण्यासाठी धूम्रपान किंवा मद्यपान करतात त्याने ताण कमी न होता अजूनच वाढतो. याचा मानसिक नाही तर शारीरिक सुद्धा गंभीर परिणाम होंतो . तंबाखूचा तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. धुम्रपानामुळे चिंता, नैराश्य, कमजोरी, तणाव वाढीस लागतात.
6 ) पोषक आहार
जर आहार पोषक नसेल तर शरीर कमकुवत होत जातं. अनेक आजार होतात आणि त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर देखील होंतो.