आरोग्यदायी तांब्याच्या भांड्यातील पाणी

Copper Water

भारतात प्राचीन काळापासून तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे फक्त निर्जंतुकच होत नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात प्रविष्ट होतात.

हे लक्षात ठेवा, तांब्याच्या भाड्यात कमीतकमी आठ तास ठेवलेले पाणीच लाभकारी असते. ज्या लोकांना कफची समस्या जास्त प्रमाणात असेल त्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावे. फार कमी लोकांना तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे महत्त्व माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास कोणकोणते लाभ होतात.

निरोगी त्वचेसाठी 

तांबे शरीरात मेलॅनीनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तसेच त्वचेच्या पेशींच्या निर्मितीत तांबे प्रमुख भूमिका बजावते. त्वचेवर सर्वात जास्त प्रभाव तुमच्या दिनचर्येचा आणि खानपानाचा पडतो. यामुळे जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल तर तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. नियमितपणे हा उपाय केल्यास त्वचा उजळेल सोबतच त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदतही होईल.

थायरॉइड

थायरॉइड एक्स्पर्ट मानतात की तांब्याचा स्पर्श असलेले पाणी शरीरातील थायरॉक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते.तांब्यातील खनिजं थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात व थायरॉईड्च्या आजारापासून आराम मिळतो. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास हा आजार नियंत्रणात येतो.

जखमा भरून काढण्यास मदत होते 

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल तसेच अ‍ॅन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत होते. या पाण्याने त्वचेतील नवीन पेशींची निर्मिती होते. त्यामुळे शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा लवकर भरण्यास मदत होते.

सांधेदुखी

अनेक लोक सांधेदुखीच्या आजाराने त्रस्त असतात. तुम्हीही या आजारामुळे त्रस्त असाल तर दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. सांधेदुखीमध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने खूप लाभ होतो. तांब्याच्या भांड्यातील गुणामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होते आणि सांधेदुखीमध्ये होणार्‍या त्रासापासून आराम मिळतो.

नेहमी तरुण दिसण्यासाठी

असं म्हटले जाते की, जास्त पाणी पिणार्‍या व्यक्तीच्या त्वचेवर वय वाढले तरीही सुरकुत्या दिसत नाहीत. ही गोष्ट एकदम खरी आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायलात तर त्वचेतील लुळेपणा दूर होतो. डेड स्किन (मृत त्वचा) निघून जाते आणि चेहरा नेहमी उजळ दिसतो.

पाचन क्रिया व्यवस्थित राहते

शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी खूपच फायदेशीर माणलं जातं. हे पाणी यकृत आणि किडनीला निरोगी ठेवण्यात मदत करतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं लाभदायक असतं. अ‍ॅसिडिटी, गॅस किंवा पोटाची दुसरी समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाण्याला अमृतासमान मानले जाते. यामुळे पाचन क्रियाही व्यवस्थित राहते.

रक्ताची कमतरता

तांबे हा पदार्थांतील आयर्न(लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत करतो. त्यामुळे रक्तातील लोह वाढवण्यासोबतच शरिरातील रक्तपुरवठा सुरळीत करण्यास मदत करतो. म्हणून अ‍ॅनिमिया ग्रस्त लोकांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्यांच्या शरिरातील रक्ताची कमतरता दूर होते.

हृदय रोगावर लाभदायी

तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदयाला निरोगी राखण्यात मदत करतं. ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतं. याशिवाय वात, पित्त आणि कफच्या तक्रारी दूर करण्यातही फायदेशीर ठरतं.
तुम्ही देखील हृदयरोगाने ग्रासित असाल तर रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यायल्यास संपूर्ण शरीरात रक्ताचा संचार व्यवस्थित होतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयाचे विकार दूर राहण्यास मदत होते.

कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक

कॅन्सर असलेल्या रुग्णांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी अवश्य प्यावे. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट असतात, जे या आजाराशी लढण्याची शक्ती प्रदान करतात. तसेच अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, तांबे कॅन्सरची सुरुवात रोखण्यास फायदेशीर ठरतं. तांब्यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात.

घातक सूक्ष्मजीव नष्ट करतात

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरातील घातक सूक्ष्मजीव नष्ट होतात. या भांड्यातील पाणी प्यायल्याने डायरिया,जुलाब, कावीळ, अतिसार यासारख्या आजाराला कारणीभूत असलेले जीवाणू नष्ट होतात.

वजन कमी करण्यात मदत होते

वजन वाढणे ही सध्याच्या काळातील एक कॉमन समस्या झाली आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी
शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यास मदत करते. शरीराला आवश्यक असलेले मेद शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक मेद बाहेर टाकण्यास मदत करतात.त्यामुळे वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास तुमचे वजन नियंत्रित राखता येईल.

वाचा : चमत्कारी किचन टीप्स