घरातील कामे, बाहेरची धूळ किंवा थंडी यामुळे तुमच्या टाचांना भेगा पडू लागल्या आहेत का? थंडीमध्ये टाचेवर भेगा येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्वचा कोरडी पडणं. याशिवाय थंडीमुळे शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि विविध जीवनसत्त्वांची कमतरता हेही टाचांना भेगा जाण्याचं प्रमुख कारण मानलं जातं. तर या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय जाणून घेऊया.
टाचेला भेगा जाण्याची कारणं कोणती ?
बुरशीजन्य संसर्ग, जीवनशैली, त्वचेशी संबंधित आजार, मधुमेह आणि थायरॉईड वाढल्यामुळेही टाचांना तडे जातात. अनेक वेळा बूट आणि मोजे चांगले नसतील तरीही टाचांमध्ये भेगा होतात. थंड वातावरणात मॉईश्चरायझरच्या कमतरतेमुळेही टाचांना भेगा पडतात. टाचांना भेगा पडण्याची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळते.
भेगा पडलेल्या टाचांवर घरगुती उपाय
खोबरेल तेल
घरगुती उपचारांमध्ये खोबरेल तेलाचा वापर केला जात आहे. आपले पाय कोमट पाण्यात भिजवून नंतर खोबरेल तेलाने मॉइश्चरायझ केल्याने लवकर आराम मिळू शकतो. तुमच्या टाचांना खोबरेल तेलाने मसाज करा, मोजे घाला आणि काही तास ठेवा. यामुळे या समस्येपासून लवकर आराम मिळतो.
मध
मध हे उत्तम मॉश्चरायझरही आहे. पायाची त्वचा आर्द्र ठेवण्यासोबतच तेथील त्वचेचं पोषणही मध करतं. यासाठी पाण्यात एक अर्धा कप मध घालावं. आणि त्या पाण्यात पाय बुडवून किमान वीस मिनिट बसावं. पाण्यातून पाय बाहेर काढल्यावर मऊ रुमालानं पाय कोरडे करुन घ्यावेत. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास टाचांवर चांगले परिणाम दिसतात.
एलोवेरा जेल
तुमचे पाय काही वेळ कोमट पाण्यात ठेवा, नंतर ते टॉवेलने पुसून घ्या आणि ते कोरडे झाल्यानंतर त्यावर कोरफडीच्या ताज्या पानांपासून काढलेले जेल लावा आणि मोजे घाला. सकाळी पाण्याने पाय धुवा. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल.
मॉइश्चराइझर
आपल्या क्रॅक टाचांपासून मुक्त होण्यासाठी, त्यांना नेहमी मॉइश्चराइझ करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही दररोज मॉइश्चराइज केले तर तुमच्या टाचांना तडे जाणार नाहीत.
हेही वाचा : Winter Hair Care : हिवाळ्यात घरीच बनवा एग्जपासून कंडिशनर