Coronavirus: इम्युनिटी म्हणजे काय? ती वाढवण्यासाठी काय करावं?

amazing facts about your immune system

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना आज लोकांना सर्वात जास्त चिंता भेडसावतेय, ती म्हणजे इम्युनिटी सिस्टीमची. माझी इम्युनिटी चांगली आहे का? इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करावे? औषध किंवा व्यायाम आहे का? हे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. यावरच डॉ. मंजिरी मणेरीकर यांनी हा ब्लॉग लिहिला आहे.

सर्वप्रथम हे लक्षात घेणे गरजेचे आहे की इम्युनिटी हा रक्तातील पदार्थ नाही की, ज्याची पातळी मोजता येईल. इम्युन सिस्टिम ही पचन, श्वसन इ. संस्थांप्रमाणेच एक संस्था आहे. त्यात लिंफ नोड, थायमस, टॉन्सिल, प्लीहा हे अवयव येतात. तसेच पांढऱ्या पेशी रक्तात असतात. त्याशिवाय लहान आणि मोठ्या आतड्यात इम्युन सेल्स विखुरलेल्या असतात. एकत्रितपणे हे सगळे अँटीजेन चॅलेंजला तोंड देतात. त्यातल्या त्यात सीबीसी या टेस्टमधून पांढऱ्या पेशींची संख्या आपण इम्युनिटी कशी आहे ते बघण्यासाठी वापरू शकतो.

पण पांढऱ्या पेशींचे संख्या चार हजार ते १० हजार इतके असते. ते Infection मध्ये वाढू शकते. त्यांचे पाच प्रकार आहेत. न्यूट्रोफील साधारण ६० ते ७५ टक्के तर लिंफोसाईट्स ४० टक्क्यांपेक्षा कमी असाव्या. रक्तातील प्रोटिनची पातळीही मोजू शकतो. कारण अँटिबॉडीज या प्रोटीन असतात.

आता इम्युनिटी कमी ज्यामध्ये असते अशा रोगांची माहिती घेऊ.

यात दोन प्रकारचे रोग येतात – 

१. प्रायमरी: म्हणजे जन्मापासून
२. ऍकवायर्ड: म्हणजे नंतर होणारे

प्रायमरी इम्युनिटीची कमतरता ही जेनेटिक असते आणि आत्ता तरी आपल्याला त्याचा विचार करण्याची गरज नाही. Acquired Immune Deficiency ही अनेक प्रकारच्या रोगात होते.

१. रक्तातील सर्व पेशी बोनमॅरोमध्ये तयार होतात. त्यामुळे रक्ताचा कॅन्सर झाल्यास किंवा अप्लास्टिक ऍनिमिया ह्या आजारात इम्युनिटी खूप कमी होते.
२. डायबेटिजमध्ये.
३. AIDS: HIV हा व्हायरस लिंफोसाईट्स मध्येच राहत असल्यामुळे ह्या रोगात लिंफोसाईट्स कमी होत जातात. त्यांची पातळी २०० पेक्षा कमी झाली तर AIDS झाला असे म्हणतात.
४. Chemothrapy दिलेले रोगी.
५. काही प्रकारच्या ऍनिमियामध्ये प्लीहा काढून टाकली जाते, असे रोगी.
६. वृद्ध लोक आणि खूप लहान मुले.

इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करावे?

यासाठी आहारात प्रोटीनचा समावेश योग्य प्रमाणात असावा. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य ठेवावी. झोप नीट घ्यावी. धूम्रपान, व्यसने करू नयेत, डायबेटिस असला तरी कंट्रोलमध्ये ठेवावा. मला काही जण औषध विचारतात किंवा ह्या औषधाने वाढेल का असे विचारतात त्यावर जरा विस्तृत उत्तर देते. आपल्या देशात क्षयरोग (टीबी) हा रोग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. हा नाकातील शिंक, खोकला यामार्फत तो पसरतो. हे जंतू हवेतून पसरतात. आपली इम्युनिटी कमी असेल तर आपल्याला नक्की टीबी होईल. पण नाहीये याचा अर्थ नक्की इम्युनिटी चांगली आहे हे समजा.

दुसरे म्हणजे बाकीचे साथीचे रोग आणि कोरोना यात मोठा फरक आहे.

१. हा संपूर्ण जगात पसरला आहे.
२. हा अतिशय संसर्गजन्य आहे.
३. एक व्यक्ती १० जणांना, पुन्हा त्यातील प्रत्येक व्यक्ती आणखी १० जणांना असा पसरवते.
४. तरुण आणि इम्युनिटी चांगली असलेले लोक याचे कॅरियर असतात.

एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, कॅरियरमध्येही व्हायरस वाढत असतो. फक्त तो रोग निर्माण करत नाही. पण तो रोग पसरवत असतोच. त्यामुळे तरुण आणि लक्षणे नसलेल्या लोकांनीही स्वतःला आयसोलेट करण्याची गरज आहे. तुमच्या घरात वृद्ध किंवा आजारी व्यक्ती असतील तर त्यांची काळजी घेताना मास्क, हॅन्ड वॉश वापरलं पाहिजे.

त्यामुळे Social Distancing अतिशय महत्त्वाचे आहे. आयुर्वेदात, होमिओपॅथीमध्येही औषधे सांगितली आहेत, असे मेसेज व्हॉट्सअपवर येत असतात. त्या त्या डॉक्टरला विचारून ती घेऊ शकता. प्रोटीन असलेली औषधे, दुधात घालायच्या पावडर, व्हिटॅमिन सी, बी, आणखीही व्हिटॅमिन घेऊ शकता. पण काही केले तरी prevention is better than cure हेच कोरोनाबाबतचे सत्य आहे. स्वतः त्याच्यापासून दूर रहा आणि दुसऱ्याला ह्याचा संसर्ग देऊ नका. ह्याने बरा होतो त्याने बरा होतो, असे मेसेज फॉरवर्ड करू नका. थोडीही लक्षणे दिसल्यास स्वतःहून टेस्ट करून घ्या. अगदी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. घरी राहा सुरक्षित रहा, एवढेच मी सांगेन.


लेखिका – डॉ. मंजिरी मणेरीकर