लॉकडाऊनमध्ये करा ‘गव्हाची कुरडई’

how to make wheat kurdai
लॉकडाऊनमध्ये करा 'गव्हाची कुरडई'

उन्हाळा सुरू असल्यामुळे आपण अनेक पदार्थ तयार करत आहोत. तसंच सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे घरच्या घरी पापड, लोणच तयार केलं जात आहे. त्यामुळे आज आपण गव्हाची कुरडई कशी करतात ते पाहणार आहोत.

साहित्य

१ वाटी गहू, तेल

कृती

१ वाटी गहू चार दिवस भिजवत ठेवा. दररोज भिजवत ठेवलेल्या गव्हाचे पाणी बदलत राहा. त्यानंतर चार दिवस भिजवत ठेवलेले गहू मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. गहू बारीक करताना पाणी घालून वाटून घ्या. मिश्रण खूप बारीक वाटू नका. जेव्हा गहू बारीक होतील त्यानंतर एक भांड घेऊन त्यावर चाळणी ठेवून ते वाटलेलं मिश्रण चाळणीत ओता. यामुळे गव्हाचा कोंडा चाळणीत राहतो आणि चिक भांड्यात पडतो. मिश्रणात भरपूर पाणी घाला. त्यानंतर हाताला तेल लावून गव्हाच्या मिश्रणातून चिक काढा. मग अजून एका भांड्यात चिक काढून झालेला कोंडा ठेवा आणि त्यात पाणी घाला. मग हा कोंडा स्वच्छ धुवून राहिलेला चिक काढा. हाताने स्वच्छ मिश्रण दाबून चिक काढा आणि स्वच्छ धुवा. त्यानंतर उरलेला कोंड्यापासून तुम्ही इतर पदार्थ करू शकता. आता चिक पहिल्या भांड्यात असलेल्या चिकात मिक्स करा. मग पुन्हा संपूर्ण चिक गाळून घ्या. त्यामुळे गव्हात असलेला पिवळसरपणा जाईल. मग हे सर्व मिश्रण एक दिवस झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी पिवळसर पाणी काढून टाका. भांड्याच्या तळाशी चिक असतो त्याला फोडून घ्यायचा. याला खडी देखील म्हणतात. ही खडी मोजून घ्यायची आहे. एक वाटी खडीसाठी एका दुसऱ्या भांड्यात दोन वाटी पाणी घ्या. त्यानंतर पाणी गरम करा. गरम करताना एक वाटी गरम पाणी बाजूला काढा आणि उरलेल्या गरम पाण्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा छोटा चमचा तुरटी बारीक करून घाला. मग गॅस कमी करून पाणी चांगलं गरम करा. त्यानंतर गरम पाण्यात चिक ओता. जेव्हा तुम्ही चिक टाकाल तेव्हा एका हाताने लाटण्याने ते हलवून घ्या. यामुळे चिकच्या गाठी होणार नाहीत. मग गॅस वाढवून ते मिश्रण सतत हलवत राहा. त्यानंतर हळूहळू चिक घट्ट होऊ लागतो. त्यामुळे १० मिनिटे गॅस बारीक करू चिक शिजवून घ्यायचा. मग लाटण्याला लागलेला चिक गरम पाणी लावून काढून घ्या. पुन्हा एकदा चिकावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी वाफा काढून घ्या. त्यानंतर पुन्हा चिक हलवा. चिक हा चांगल्या घट्ट शिजवण्यासाठी आणखी १५ ते १० मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घ्या. चिक घट्ट झाल्यानंतर साच्याला तेलाचा हात लावून गरम गरम चिक त्यात घाला. मग एका प्लास्टिकवर किंवा घरातल्या साडीवर कुरडई पसरट घाला आणि दोन ते तीन दिवस वाळत ठेवा. अशा प्रकारे या लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरच्या घरी गव्हाची कुरडई करा.