डिजिटलच्या या युगात बहुतांश क्षेत्रातील काम ऑनलाईन झाली आहेत. यामुळे आतापर्यंत पाश्चिमात्य देशात लोकप्रिय असलेलं वर्क फ्रॉम होम कल्चर आता आपल्याकडेही स्थिरावलं आहे. वर्क फ्रॉम होममध्ये ऑफिसला जाण्याच्या धावपळीपासून सुटका तर होतेच शिवाय प्रवासाला लागणारा वेळ, पैसा आणि त्यासाठी करावी लागणारी दमछाक यातूनही सुटका होत असल्याने घरून काम करण्याची ही ऑनलाईन पद्धती आता आपल्याकडेही लोकप्रिय होऊ लागली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की ऑफलाईन काम करण्याच्या तुलनेत ऑनलाईनमुळे तुमच्यावर कामाचा ज्यादा बोझा पडतो. याचे प्रमाण जवळ जवळ दोन अडीच तासांनी अधिक वाढतं. यामुळे सुरुवातीला तुम्हाला जरी कामाचा हा बोझा सामान्य वाटत असला तरी नंतर मात्र त्याचे दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसू लागतात.
तज्त्रांनी केलेल्या अभ्यासानुसार, जेव्हा तुम्ही घरून काम करता त्यावेळी तुमच्यावर ऑफिसच्या कामाच्या दबावाबरोबरच घरातील कामांचा दबावही वाढतो. परिणामी जर तुम्ही आठवड्यात 55 तासांपेक्षा जास्त काम केले तर ते तुमच्या अकाली मृत्यूचे कारण बनू शकते. यामुळे काम करण्यासोबतच तुमच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्वाचे आहे. त्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया.
टाईमटेबल
जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करून एक वर्षाहून अधिक काळ लोटला असेल, तर तुम्ही दिवसातील बहुतांश वेळ लॅपटॉपसमोर घालवलेला असणार. त्यामुळे तुम्हाला काम पूर्ण करण्याची सतत चिंता लागून राहीलेली असते. पण असे करणे योग्य नाही. त्यासाठी कामासाठी दिलेल्या वेळेतच काम करा. त्यानंतर आपल्या वैयक्तिक जीवनासाठी वेळ द्या आणि लॅपटॉप बाजूला ठेवा.
स्वत: ला वेळ द्या
वर्क फ्रॉम होम करताना असा एक गैरसमज असतो की घरातील कामे करून काम करता येते. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. घरातील कामे आणि ऑफिसच्या कामातून आराम मिळेपर्यंत तुमचा संपूर्ण दिवस संपलेला असतो.
त्यामुळे व्यायामासाठी किंवा मेडीटेशनसाठी तुम्हाला वेळ मिळत नाही. पण तसे न करता तुमचे शेड्युल बनवा. त्याप्रमाणे व्यायाम आणि मेडीटेशनसाठी वेळ काढा.
बॉसला कामाच्या तासांबद्दल सांगा
तुम्ही जर घरून काम करत असाल, तर तुम्ही तुमच्या कामाच्या वेळा तुमच्या वरिष्ठ किंवा बॉसला सांगाव्यात. तुम्ही कोणत्या वेळी ऑनलाइन आहात आणि कोणत्या वेळी नाही हे स्पष्ट करावे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही सतत ऑनलाइन आहात असा विचार करून ते तुमच्यावर कामाचा ताण वाढवू शकतात.
उर्जा
काम करण्याआधी स्वत:ची उर्जेची पातळी ओळखा. तुमचा काम करण्याचा स्टॅमिना बघूनच जबाबदारी घ्या.
यादी
वर्क फ्रॉम होम दरम्यान तुम्हाला ऑफिसच्या कामाबरोबरच घरातील कोणती कामं करावी लागणार आहेत ते लक्षात घ्या. ऑफिस कामाची वेळ आणि घरकामाच्या वेळेचा बॅलन्स सांभाळा.