घरलाईफस्टाईलजास्त जोखीम असलेल्या गर्भवतींनी अशी घ्यावी काळजी

जास्त जोखीम असलेल्या गर्भवतींनी अशी घ्यावी काळजी

Subscribe

सध्याची जीवनशैली आणि कामाचे स्वरुप पाहता अनेक महिला जास्त जोखीम असलेल्या गर्भावस्थेतून जात असतात. तुम्ही जास्त जोखीम असलेल्या गर्भावस्थेतून जात असाल तर भावनिक उतार-चढाव होणे साहजिक आहे. चिंतातुरता आणि तणाव हे अपरिहार्य असले तरी या जास्त जोखीम असलेल्या गर्भावस्थेचा जास्त त्रास करून घेण्याची आवश्यकता नाही. अप्रतिम वैद्यकीय सुविधा आणि नियमित जन्मपूर्व आरोग्यसेवांचा विकास झाल्यामुळे जास्त जोखीम असूनही तुमचे बाळ सुदृढ असू शकते आणि प्रसूत सुरक्षित असू शकते. जास्त जोखीम असलेल्या गर्भवतींनी कशी काळजी घ्यावी, याची माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर यांनी दिली आहे.

सुदृढ बाळासाठी अशी काळजी घ्या

स्वीकार

जास्त जोखीम असलेली गर्भावस्था हाताळण्याची पहिली पायरी म्हणजे या परिस्थितीचा स्वीकार करणे. आपल्याला जास्त जोखीम असलेली गर्भावस्था आहे हे माहीत असेल तर तुम्ही अधिक जागरुक असता आणि ही परिस्थिती हाताळण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार असता. तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जाणार आहात हे तुम्हाला माहीत असते. यात होणाऱ्या गुंतागुंतीचीही तुम्हाला जाणीव असते. तुम्ही ही परिस्थिती आहे हे मान्यच केले नाही तर तुम्ही यातील धोके समजू शकणार नाही आणि आवश्यक उपचार तुमच्यावर होणार नाहीत.

- Advertisement -

विश्वास

जास्त जोखीम असलेली गर्भधारणा हाताळण्याची गुरूकिल्ली म्हणजे तुमच्या डॉक्टरवर विश्वास ठेवणे. तुमचे डॉक्टर तुमचे हित चिंततात आणि त्यानुसार सल्ला देतात यावर विश्वास ठेवा. इंटरनेटवरील लेख वाचणे किंवा नातेवाईक किंवा मित्रमंडळींच्या अनाहूत सल्ला ऐकून विनाकारण गुंतागुंत वाढू शकते. तुम्ही केवळ तज्ज्ञांचाच सल्ला घ्यावा. ऑनलाइन अनावश्यक माहिती वाचणे आणि मनाचा गोंधळ वाढविणे टाळा.

सातत्य

तुमच्या व्यवस्थापन नियोजनात सातत्य ठेवा. तुमची औषधे वेळेवर घ्या. कोणतीही सप्लिमेंट्स चुकवू नका. हे सर्व घटक तुमच्या सुदृढ बाळाच्या वाढीसाठी गरजेची आणि महत्त्वाचे असतात. काही साइड इफेक्ट्स उद्भवले तर लगेचच तुमच्या डॉक्टरना कळवा. कोणताही त्रास होत असेल तर डॉक्टरना कळविण्यास कचरू नका. तुमच्या जास्त जोखीम असलेल्या गर्भावस्थेत तुम्हाला कोणत्या समस्या जाणवत आहेत, ते विस्तृतपणे सांगा.

- Advertisement -

काटेकोर नियंत्रण

आहार हा निरोगी जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असतो. तुमची जास्त जोखीम असलेली गर्भधारणा पाहता सकस आहार अधिकच गरजेचा ठरतो. प्रत्येक तलफ भागविण्याच्या मोहात पडू नका. प्रमाणात आहार घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवा आणि स्निग्ध व साखरयुक्त पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवा. जंक फूड पूर्णपणे वर्ज्य करा. गर्भलिंग मधुमेह असेल तर तुम्हाला साखर पूर्ण वर्ज्य करावी लागेल. गरोदरपणात उच्च रक्तदाब म्हणजेच एक्लेम्प्सिया आणि प्रि-एक्लेम्प्सिया असेल तर मीठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला पूर्ण विश्रांती घेण्यासही सांगितले जाऊ शकते. अतिरिक्त मीठ व साखर शरीरात जाऊ नये यासाठी आहाराचे पथ्य पाळणे हितकारक असते.

नियमित व्यायाम

व्यायामामुळे शरीर मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या फिट राहते. पण तुम्हाला जास्त जोखीम असलेली गर्भधारणा असेल आणि प्लॅसेंटाने गर्भाशयाचा अंशतः किंवा पूर्ण भाग आच्छादला असेल तर योगासने व प्रसवपूर्व व्यायाम करू नये. तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि तुमच्यासाठी योग्य असलेले व्यायाम निवडा आणि ते नियमितपणे करा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -