होळीच्या दिवशी त्वचेची काळजी कशी घ्याल?

होळी खेळताना वापरल्या जाणार्‍या हानिकारक रंगांमुळे त्वचा कोरडी होणे, खाज येणे, ऍलर्जी, इन्फेक्शन, लालसरपणा आणि पुरळ यांसारख्या त्वचेच्या समस्या भेडसावतात. त्यासाठी झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सौरभी देशपांडे यांनी काही महत्वपूर्ण असे उपाय सांगितले आहेत. 

How to take care of your skin on Holi?

होळीचा सण म्हणजे रंगाची उधळण. याकरिता वापरल्या जाणार्‍या रंगांमध्ये असणारे रासायनिक पदार्थ त्वचेस हानीकारक ठरतात. त्यामुळे रंगाची उधळण करताना प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्वचेची निगा राखण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचमुळे हानिकारक रंगांमुळे उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला देत आहोत. होळी खेळताना वापरल्या जाणार्‍या हानिकारक रंगांमुळे त्वचा कोरडी होणे, खाज येणे, ऍलर्जी, इन्फेक्शन, लालसरपणा आणि पुरळ यांसारख्या त्वचेच्या समस्या भेडसावतात. त्यासाठी झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सौरभी देशपांडे यांनी काही महत्वपूर्ण असे उपाय सांगितले आहेत.

बर्फाच्या तुकड्यांचा करा वापर
होळी खेळण्याआधी बर्फाचे तुकडे त्वचेवर फिरविणे नक्कीच फायदेशीर ठरु शकते. असे केल्याने त्वचेवरील छिद्र बंद होऊन त्वचेत रंग प्रवेश करण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे मुरुमांना प्रतिबंध करता येणे शक्य होईल. बर्फाचे तुकडे किमान 15 मिनिटे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चोळू शकता.

सनस्क्रीनचा वापर करा
होळी ही घराबाहेर खेळली जाते. एखादी व्यक्ती सतत सूर्याच्या संपर्कात असते, रंग आणि पाणी तुमच्या त्वचेतील ओलावा कमी करु शकते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि टॅन (काळवंडणे) होते. योग्य सनस्क्रीन निवडण्यापूर्वी तज्ज्ञांची मदत घ्या. तसेच तुम्ही जी कोणती सनस्क्रीन वापराल त्याचा एसपीएफ 50 आहे की नाही हे नक्की तपासून घ्या.

शरीराला तेल लावा
रंग खेळण्याआधी तुम्ही तुमच्या केसांनाच नव्हे तर शरीराला देखील तेल लावावे. कारण तेल लावल्याने रंग सहज काढण्यास मदत होते. तसेच, रंग त्वचेत प्रवेश करत नाही. शिवाय, तेल त्वचेचा नैसर्गिक पोत सुधारण्यास आणि ऍलर्जी तसेच मुरुमांपासून दूर ठेवण्यास मदत करेल. यासाठी नारळ किंवा बदाम यासारखे कोणतेही तेल निवडू शकता.

चांगल्या दर्जाचा लिप बामचा वापर करा
एखादी व्यक्ती चेहऱ्याची काळजी घेते आणि ओठांकडे दुर्लक्ष करते. असे अजिबात करू नका. तुमच्या त्वचेचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे तुमचे ओठ. म्हणून, होळी खेळण्यापूर्वी तुमचे ओठ लिप बामच्या थराने झाकून घ्या. नैसर्गिक लिप बाम तुमच्या ओठांना ओलावा देतात आणि हानिकारक रंगांपासून तुमच्या ओठांना भेगा पडण्यापासून रोखतात. लिप बाममुळे ओठ मऊ राहतात.

पुरेसे पाणी प्या
दिवसातून कमीतकमी 2 लिटर पाणी पिऊन आपले शरीर हायड्रेटेड राखणे गरजेचे आहे. जेणेकरुन कोरडेपणा आणि ब्रेकआउट्सपासून दूर राहण्यास मदत होईल, तसेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होईल.


हेही वाचा – Holi 2023 : केस, चेहरा आणि नखांवरील रंग निघत नसल्यास ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स