आहार भान- करूया उन्हाळ्याचा सामना नैसर्गिक पद्धतीने! भाग – २

दोन तीन महिन्यांची सुखदायक थंडी अचानक संपते आणि मार्च महिन्यात तापमान एकदम वाढते. या बदलेल्या हवामानाशी जुळवून घेताना तारांबळ उडते. वृध्द माणसे, मधुमेही, हार्ट पेशंट, कॅन्सर पेशंट, मेनोपॉज मधून जात असणाऱ्या स्त्रिया यांना खूप त्रास होतो. शरीराची लाही लाही होणे, लघवीला जळजळ, घशाला शोष् पडणे, हृदयाची धडधड असे अनेक त्रास होतात. काही साध्या घरगुती उपायांनी हे त्रास कमी होऊ शकतात.

भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पण नुसतेच ढसाढसा पाणी पिण्याने ही त्रास होतो. काही काही आजारात नुसत्या पाण्याची चवही नकोशी होते. मागच्या भागात आपण यावर उपाय म्हणून धणे जिऱ्याचे पाणी कसे बनवावे आणि प्यावे हे पहिले होते. आज आपण आणखी काही उपाय पाहू.

सारखा घाम आल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. शरीरातील क्षार बाहेर टाकले जातात म्हणून थकवा येतो. यावर बाहेरच्या शीतपेय आणि कृत्रिम सरबत पेक्षा घरी बनवलेली सरबते पिणे हा चांगला मार्ग आहे. शरीर थंड करण्या बरोबरच या पेयांचे दुसरेही अनेक फायदे आहेत.( मधुमेहीनी आपल्या डॉक्टरांच्या सल्याने घ्यावे)

1. आवळा सरबत – मागच्या महिन्यात आपण घरी आवळा सरबत कसे बनवावे हे पहिले आहे. रोज 1-2 चमचे हा पल्प घेवून एक ग्लास सरबत बनवणे. रोजचे निदान एक ग्लास सरबत तुम्हाला ताजेतवाने ठेवेल.

2. कोकम सरबत – कोकणातील घरगुती कोकम सरबत सगळीकडे मिळते. त्यात थोडे जिरे पूड घालून घ्यावे. बाजारातून कोकम आणून घरीही कोकम सरबत करता येते. कोकम पित्तशामक तर आहेच पण तोंडाची रुची वाढवते आणि पचन ही सुधारते.

3. बडीशेपेचे पाणी – एक चमचा बडीशेप एक ग्लास पाण्यात एक तास भिजवून मग ते पाणी प्यावे. शरीर आतून थंड होते. बडीशेप ही तोंडाची रुची वाढवते. पचन सुधारते.

4. पुदिन्याची पाणी – ताजा पुदिना थोडा ठेचून पाण्यात अर्धा तास घालून ठेवावा. नंतर गाळून हे पाणी प्यावे. पुदिन्याचे पाणी वापरून तुम्ही झक्कास लिंबू सरबत किंवा बडीशेपचे सरबत बनवून पाहा. सगळी शीतपेय विसरून जाल. त्यात पाहिजे तर थोडा जलजिरा मसाला टाका. उन्हाळ्यात संध्याकाळी मरगळलेल्या जीवाला तरतरी देणारे पेय आहे हे.

5. सब्जाचे पाणी – सब्जा ही तुळशी वर्गातील वनस्पती. सब्जाच्या बिया फालुदाची शोभा वाढवतात. सब्जाचे पाणी शरीर थंड करते. एक चमचा गुलकंद अधिक एक चमचा सब्जा असे एक ग्लास पाण्यात मिक्स करावे. सुंदर सरबत तयार होते. सब्जा पोटही साफ करते.

6. लिंबू सरबत हे तर सर्वांचेच आवडते आहे. फक्त करताना त्यात थोडे आले कुटून टाकावे किंवा थोडीशी सुंठ पावडर टाकावी म्हणाजे उन्ह बाधत नाही.

सर्व सरबते करताना सैंधव मीठ वापरावे म्हणजे अधिक लाभ होतो. ऑफिस मध्ये जाताना एका बाटलीत सरबत घेऊन जावे. जरूर करून बघा. या उन्हाळ्याचा प्राणी पक्षांनाही त्रास होत असणार. तेव्हा आपल्या गॅलरीत, गच्चीत, अंगणात त्यांच्या साठी पण एका भांड्यात पाणी ठेवा. तेही तुम्हाला दुवा देतील.

डॉ‌. ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]