आहार भान- करूया उन्हाळ्याचा सामना नैसर्गिक पद्धतीने!

शरीर आतून थंड करायचा सर्वात सोप्पा उपाय म्हणजे धणे जिऱ्याचे पाणी पिणे

सूर्यदेवाचा पारा चांगलाच चढू लागला आहे. उन्हाळ्याचे 3-4 महिने काढायचे आहेत. गरमी वाढली की अनेक प्रकारे त्रास होऊ लागतो. मधुमेही, हृदय रोगी, कॅन्सर पेशंट यांना तर फारच त्रास होती. शरीरातील उष्णता वाढल्याने अस्वस्थ वाटणे, घशाला शोष पडणे, तहान न शमणे, अॅसिडीटी वाढणे, लघवीला जळजळ, हृदयात धडधड अशी अनेक लक्षणे दिसू लागतात.

या सगळ्याचे शमन करण्यासाठी लोकं मग शीतपेय किंवा फ्रीज मधील थंड पाणी पिणे, आइसक्रीम खाणे, रस्त्या वरची कृत्रिम रंग टाकलेली सरबते पिणे असे उपाय शोधतात. पण हे कुपथ्य होते. सर्दी, खोकला, ताप, अतिसार अशा आजारांना आमंत्रण ठरते. नैसर्गिक पद्धतीने शरीराला आतून कसे थंड करायचे हे आपण पुढच्या काही भागात पाहूया. या नैसर्गिक उपायांनी शरीर आतून थंड तर होतेच पण इतरही अनेक फायदे होतात.

शरीर आतून थंड करायचा सर्वात सोप्पा उपाय म्हणजे धणे जिऱ्याचे पाणी पिणे. धणे जिरे पचन सुधारतात. जिऱ्यामुळे मुत्रविसर्जन सुलभ, सहज होते.

1. तीन वाट्या धणे आणि 1 वाटी जिरे घ्यावे. कढईत वेगवेगळे कोरडे किंचित भाजावे .

2. थंड झाल्यावर एकत्र करून बारीक पूड करून घ्यावी. हवाबंद डब्यात ठेवावी. जरूर लागेल तशी वापरावी.

3. तुम्ही घरी असाल तेव्हा सकाळी 8 वाजता एका स्टीलच्या तांब्यात किंवा भांड्यात एक लिटर पाणी घ्यावे. त्यात दोन मोठे चमचे धणे जिरे पूड घालावी. उकळवयाची गरज नाही.

4. पंधरा मिनिटांत ही पूड खाली बसते. तहान लागेल तेव्हा हे पाणी थोडे थोडे प्यावे. दुपारी एक वा जे पर्यंत हे पाणी संपवावे. खाली उरलेली पूड पोटात गेली तरी काही होत नाही. धणे जिरे आपण स्वयंपाकात वापरतोच.

5. दुपारी चार वाजता परत असे एक लिटर पाणी बनवावे. रात्री 9 पर्यंत संपवावे.

6. धणे जिऱ्याचे पाणी जर जास्त काळ ठेवले तर एक प्रकारचा वास त्याला येऊ लागतो म्हणून 3-4 तासात पाणी संपवावे.

7. तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर थोडा बदल करायचा. एका डबीत आख्खे धने जिरे घेवून जायचे. तुमच्या पाणी

प्यायाच्य बाटलीत एक मोठा चमचा धणे जिरे घालावे. हे पाणी ३-४ तासात संपवावे. परत पाणी भरायच्या आधी बाटली स्वच्छ विसळून घ्यावी. नव्याने धने जिरे टाकावे.

8. बाहेर प्रवासाला जातानाही असेच आख्खे धने जिरे घालून पाणी न्यावे. त्याने बाहेरचा उन्हाळा बाधत न्ही.

9. बाटली मध्ये जर धणे जिरे पूड घातली तर ती बाटलीला चिकटते आणि ब्रश ने साफ करावे लागते म्हणून आख्खे धणे जिरे घालावे.

मला याचा खूप फायदा झाला. आमच्या घरातील सगळे जण उन्हाळा सुरू झाला की हेच पाणी पितात. घरी येणाऱ्या पाहुण्यांना पण आम्ही हेच पाणी देतो. वाचल्या वाचल्या लगेच करून बघा. तुम्हालाही गुण येईल .

डॉ ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]