एकाग्रता वाढवा

अनेकदा एक काम करताना दुसर्‍याच विचारांचे सत्र आपल्या डोक्यात सुरू असते. त्यामुळे हातातील काम करताना अडथळ्यांना सामोरे जावे लागते. एकाग्रतेच्या अभावी आपले काम फिस्कटते. एकाग्रता म्हणजे एखादं काम करतेवेळी दुसरे कोणते काम न करणे किंवा दुसर्‍या कोणत्या कामाचा विचार न करणे होय. एकाग्रता बुद्धीला चालना देते. मात्र एकाग्रता वाढवावी कशी असा प्रश्न पडतो.

पुरेशी झोप घ्या – पूर्ण विश्रांती झालेली नसेल तर चिडचिडेपणा वाढतो व विषयात मन लागत नाही. त्यामुळे पुरेशी झोप घ्या. रोज किमान आठ तास झोप घ्या. तसेच सकाळी किंवा दुपारच्या जेवणाआधी कमीतकमी २० मिनिटे ध्यान करा. यामुळे शरीर व मनाला विश्रांती मिळते. आणि एकाग्रता देखील वाढेल.

पौष्टिक आहार महत्त्वाचा – तुमच्या खाण्याच्या सवयीवरही एकाग्रता अवलंबून असते. जर तुम्ही मिठाई, आईस्क्रीम व चॉकलेट्स सारखे पदार्थ खाल्ल्याने मन अस्थिर, चंचल होते. त्यामुळे एकाग्रतेवर परिणाम होतो. तसेच खूप तेलकट, मसालेदार व जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाणेही टाळावे. अशा पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने सुस्ती येते. यामुळे एकाग्रता वाढीवर परिणाम होतो.

प्राणायाम, योगासने करा – फक्त अडीच मिनिटे प्राणायाम केल्याने तीन तास एकाग्रता टिकून राहू शकते. आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिरात शिकविला जाणारा एकाग्रता प्राणायाम केल्याने हे साध्य होते. हा प्राणायाम केल्याने स्मरणशक्ती वाढते, जे काही ग्रहण केलेले आहे ते टिकवून ठेवण्याची शक्तीही वाढते. तसेच नियमित सूर्यनमस्कार व सर्वांगासन केल्याने मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. परिणामी सतर्कतेत, सजगतेत वाढ होते व मनाचे भरकटणे कमी होते, चांगली प्रगती होते.

वाचनाची आवड जोपासा – आवडीचा चित्रपट किंवा खेळ पाहताना आपण एक टक टीव्हीकडे नजर करतो. त्याचप्रमाणे तुमच्या आवडीच्या विषयावर एखादे पुस्तक मन लावून वाचा. असे केल्याने तुमच्या ज्ञानात भर पडते, शिवाय एकाग्रता वाढण्यासही मदत होते.