महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. ज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राजकारण, विज्ञान , कला , संस्कृती आणि इतर अनेक क्षेत्रातील आपले योगदान देणाऱ्या महिलांचा यानिमित्ताने सन्मान केला जातो. हा दिवस महिलांसाठी खूप खास असतो. महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या कामगिरीला प्रोत्साहन देण्याचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. आणि महिलांशी संबंधित सर्व प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते. या दिवशी, विकसित आणि विकसनशील देशांमध्ये महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या बळकट करण्यासाठी नवीन धोरणांवर देखील चर्चा केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की महिला दिन साजरा करण्यासाठी ८ मार्च हा दिवस का निवडला गेला? याविषयी आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.
८ मार्च रोजीच का साजरा केला जातो?
महिला दिन साजरा करण्यासाठी ८ मार्च हा दिवस निवडण्याचे एक खास कारण आहे. खरंतर दि. 8 मार्च 1917 रोजी, पॅट्रॉग्राड या रशियन साम्राज्याच्या राजधानीत, वस्त्रोद्योगातील स्त्री कामगारांनी संपूर्ण शहरभर निदर्शने केली. ही रशियन राज्यक्रांतीची सुरुवात मानली जाते. सेंट पिट्सबर्ग मधील महिला ‘ ब्रेड व शांतता’ अर्थात ‘भाकरी आणि शांती’ या मागणीसाठी संपावर गेल्या. महिलांनी शांतता कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी 8 मार्च रोजी रॅली काढल्या. या कारणास्तव, आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च रोजी साजरा करण्यास सुरुवात झाली. नंतर 1975 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च या दिवसाला आंतरराष्ट्रीय महिला दिनाला मान्यता दिली.
2025 च्या महिला दिनाची थीम
आंतरराष्ट्रीय दिनाची थीम पहिल्यांदा 1996 मध्ये सादर करण्यात आली. यावेळी 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम ‘अॅक्सिलरेट अॅक्शन’ अशी निश्चित करण्यात आली आहे. या थीमचे उद्दिष्ट महिलांना समानता प्रदान करणे हा आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश महिलांना पुरुषांइतकाच आदर देणे आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा आहे. महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि समाजात प्रचलित असलेली असमानता दूर करण्यासाठी या दिवसाचे खूप महत्त्व आहे.
हेही वाचा : Fatty Liver Disease : 80 टक्के आयटी कर्मचारी फॅटी लिव्हरने ग्रस्त, वेळीच व्हा सावध
Edited By – Tanvi Gundaye