आपल्याकडे चहा, कॉफी हे बेस्ट मूड रिफ्रेशनर म्हणून प्यायले जातात. यामुळेच सकाळ सकाळी एक कप गरमा गरम वाफाळणारा चहा किंवा कॉफी प्यायलाने सगळा थकवा गायब याच मानसिकतेतून चहा कॉफीचे सेवन केले जाते. याचपार्श्वभूमीवर काही जण लहान मुलांनाही चहा कॉफी देतात. पण लहान वयात मुलांना चहा ,कॉफी देणे त्यांच्या आरोग्यासाठी अयोग्य असल्याचा इशारा तज्त्रमंडळींनी दिला आहे.
बालतज्त्रांच्या मते १४ वर्षांखालील मुलांना कधीही चहा किंवा कॉफी देऊ नये. त्यामुळे मुलांची वाढ खुंटू शकते. कॉफीमध्ये कॅफिन नावाचा घटक असतो. जो मेंदूला उत्तेजित करतो आणि हृदयाचे स्पंदनही वाढवतो. तसेच कॅफिनमुळे गैस्ट्रीक अॅसिडीटी, हायपर अॅसिडीटीसारख्या समस्या निर्माण होतात. जर लहान मुलाला कॉफी दिली तर त्यामुळे त्यांच्या झोपेवर त्याचा परिणाम होतो.
तसेच चहामध्येही टैनिन नावाचा घटक असतो. ज्यामुळे मुलांचे दात आणि हाडे ठिसूळ होऊ शकतात. यामुळे त्यांची वाढ होत नाही. ज्यामुळे त्यांचा शारिरीक विकास होत नाही तसेच या घातक घटकांचा मुलांच्या मानसिक विकासावरही परिणाम होतो.
यामुळे तज्त्र लहान मुलांना चहा किंवा कॉफी न पाजण्याचा सल्ला देतात. पण हल्ली बाजारात हर्बल टी उपलब्ध आहेत. ते मुलांना देण्यास हरकत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तसेच जर मुलांना चहा कॉफीची सवयच झाली असेल तर आलं, पुदीना, गवतीचहा, वेलची तसेच इतर औषधी वनस्पतींचा काढा करून तो चहा म्हणून मुलांना पिण्यास द्यावा असा सल्ला तज्त्र देतात. त्यामुळे मुलांना कोणतेही नुकसान होणार नसल्याचा दावा तज्त्रांनी केला आहे.
हेही वाचा :