खारबाव सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी नवा अध्याय

वाढत्या लोकसंख्येसोबत शहरांची संख्याही वाढत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अगदी पनवेलपर्यंत शहरे विस्तारीत होत असली तरी त्यांची संख्या कमीच पडत आहे. त्यामुळे रोजच नवनवीन शहर, नगरे वसवली जातात. आधी शहरे वसवली जातात की आधी दळणवळणासाठी मार्ग तयार केला जातो, हा प्रश्न आता गौण ठरला आहे. सध्या आधी शहरांची विस्तारीकरणासोबत दळणवळणाची, प्रवासाची साधने निर्माण होऊ लागली आहेत. त्यातील एक नवीन ठिकाण म्हणजे खारबाव. ठाणे शहराच्या वेशीला लागून असलेल्या गावांचा विकास एमएमआरडीएच्या मदतीने करण्याचा निर्धार ठाणे महापालिकेने केला आहे. खारबाव ते नागरे या गावांपर्यंतचा एकूण 13 हजार 307 एकर जागेचा विकास प्रस्तावित आहे.

Property Kharbav

ठाणे महानगर पालिकेने केवळ उद्घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात खारबाव परिसरात अनेक विकासकांच्या माध्यमातून आपले बस्तान बसायला सुरुवात झाली आहे. यामध्ये सावन्त कन्स्ट्रक्शन, क्रिष्णा डेव्हलपर्सने, आशापुरा पुनम हिल्स, तिरुपती बालाजी ग्रूप्स, महादेव कन्स्ट्रक्शन, ओमसाई एन्टरप्राईझेस आदी विकासकांनी छोट्या-मोठ्या वसाहती निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत या वसाहतींकडे सेकन्डहोम आणि गुंतवणूक म्हणून पाहिले जात असले तरी भविष्यात यामध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात सर्वाधिक इमारती या सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून निर्माण केल्या जात आहेत. ज्यामध्ये अगदी 15 लाखापर्यंत वन-बीएचके मिळत आहे. त्यामुळे अनेक माध्यमवर्गीय कुटुंबेदेखील या परिसराकडे वळू लागली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवासाकरिता रेल्वेची सुविधा असणे. दिवा-वसई मेमू मार्गावर ‘खारबाव’ रेल्वे स्थानक आहे. हा पर्याय उपलब्ध असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हे ठिकाण अतिशय सोयीचे वाटत आहे. भिवंडीपासून अवघ्या आठ मिनिटाच्या अंतरावर खारबाव वसले आहे. कल्याणहून खारबावपर्यंत जाण्यास केवळ अर्धातास लागतो. तर ठाणे रेल्वे स्थानकापासून सुमारे 36 किलोमीटरचे अंतर कापायला सध्या 40 ते 45 मिनिटे लागत आहेत.

भविष्यात गायमुख ते खारबाव या उड्डाणपूलामुळे हे अंतर बर्‍याच अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत ठाणे महानगर पालिकेच्या वतीने प्रकल्प अहवालाचे काम सुरु आहे. हा पुल एमएसआरडीसीच्या माध्यमातून बांधणी करण्याबाबत शासनस्तरावर निर्णय झाला आहे. या पुलामुळे वसई-अलिबाग मल्टी मोडल कॉरीडोर ठामपाच्या माजिवडा-ओवळा भागास जोडला जाणार आहे. त्यामुळे खारबाव परिसर ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर येणार आहे. प्रस्तावित गायमुख ते खारबाव उड्डाणपूलामुळे या परिसरातील घरांसाठीची मागणी आत्तापासूनच वाढण्यास सुरुवात झाली आहे. येणार्‍या काळात या महसुली गावांचा चेहरामोहरा पालटणार असून नोकरी-व्यवसायाच्या नव्या संधीचे दालन येथे खुले होणार आहे.

खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोंडी, नागरे ही गावे ठाणे शहरापासून जवळ असलेली परंतु विकासाअभावी आजपर्यंत दुर्लक्षित होती. मात्र आता एमएमआरडीएच्या माध्यमातून हा परिसर विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. ज्यामध्ये ठाणे महापालिकेचा देखील सहभाग असणार आहे. या गावांची हद्द याचे ड्रोन शूटिंग पूर्ण झाले असून त्याचे नकाशेही बनविण्यात आले आहेत. ही गावे मिळून एक नवीन शहरच येथे तयार होण्याच्या मार्गावर आहे. याची चाहूल सर्वप्रथम विकासक आणि बिल्डर मंडळींना लागल्याने त्यांनी या परिसरात आपापले मोठ मोठे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये अनेक प्रकल्प अर्धेअधिक पूर्ण झाले आहेत ज्यामध्ये नागरिकांनी आपली गुंतवणूकही केली आहे. शासनाच्या रेरा कायद्यामुळे वेळीच घरे देण्याचे बंधन असल्याने आता दिलेल्या वेळेतच ही घरे मिळणार ही शाश्वती आहे. त्यानुसार सध्या अनेकांनी या ठिकाणी आपले बस्तान मांडायला सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत या परिसराला भिवंडी महानगर पालिकेच्या माध्यमातून पाण्याची सोय करण्यात येत आहे.

खारबाव परिसरात भव्य अशा सुंदर वसाहतीमधून वन बीएचके 16 लाखाच्या आसपास उपलब्ध असून यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास आणि अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी अडीच लाख रुपयांच्या तर अल्प उत्पन्न गटातील लाभार्थी 2.67 लाखांच्या अनुदानास पात्र असतील. त्यामुळे सर्व सामान्यांचा ओढा या परिसरात अधिकाधिक वाढत आहे. त्याच दृष्टीने विकासकही आपल्या नवनवीन प्रकल्पाची आखणी करत आहेत. त्याचबरोबर बड्या विकासकांच्या सहभागाने उच्च श्रीमंत वर्गाकरिता मोठमोठ्या टॉवरच्या प्रकल्पांचीही मुहूर्तमेढ रोवली जात आहे. नवीन ठाणे शहराच्या निर्मितीला खारबावमधून सुरुवात झाली आहे. आज खारबावच नव्हे तर आजुबाजूच्या गावांच्या भागांचाही विकास झपाट्याने होत आहे. भविष्यात पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे या गावांचा त्यात समावेश होईल. वसईजवळच्या तुंगारेश्वरपर्यंतचा भागही यामध्ये अंतर्भूत होईल. याच्या विकासासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून ठाणे महापालिका व एमएमआरडीएची संयुक्त नेमणूक होणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये खारबाव अग्रस्थानी असल्याने भविष्यात केवळ सर्वसामान्य नागरिकांचीच नव्हे तर उच्चभ्रू श्रीमंतांचीही घराची गरज भागवण्यास खारबाव सक्षम होत आहे. त्यामुळे या ठिकाणची गुंतवणूक निश्चितच फलदायी असेल.
(लेखक दै. ‘आपलं महानगर’चे ठाणे जिल्ह्यातील वार्ताहर आहेत.)