ही आहेत किडनी डॅमेजची लक्षणेकिडनी अर्थात मूत्रपिंड हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीरातील अनेक महत्त्वाची कार्ये करतो. मूत्रपिंडाची अनेक कार्ये असतात, त्यातील प्रमुख कार्य म्हणजे रक्त स्वच्छ करणे, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे आणि अतिरिक्त द्रवपदार्थ फिल्टर करणे. याशिवाय, मूत्रपिंड रक्तदाब नियंत्रित करण्यास, इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यास, लाल रक्तपेशी तयार करण्यास आणि हाडे निरोगी ठेवण्यासही मदत करतात.अशा परिस्थितीत, निरोगी राहण्याकरता मूत्रपिंडाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. वेगाने बदलणारी जीवनशैली आणि खाण्याच्या अयोग्य सवयींमुळे अनेकदा मूत्रपिंडाचे नुकसान होते. परंतु ते लवकर लक्षात येत नाही. जेव्हा मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आढळण्यास सुरूवात होते तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो. अशा परिस्थितीत, मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे लवकरात लवकर ओळखणे महत्वाचे आहे, जेणेकरून वाईट परिणाम टाळता येतील. किडनी निकामी झाल्यावर दिसणारी काही लक्षणे जाणून घेऊयात.
पाय आणि चेहऱ्यावर सूज येणे :
जेव्हा किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकू शकत नाहीत, तेव्हा ते शरीरात साचते, ज्यामुळे पायांना सूज येते आणि डोळ्यांभोवतीही सूज येऊ लागते.
उच्च रक्तदाब :
खराब किडनी शरीरात उच्च रक्तदाब निर्माण करणारी रसायने सोडते, ज्यामुळे तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या दिसून येते.
लघवीत फेस येणे :
लघवीमध्ये थोडासा फेस येणे सामान्य आहे, परंतु जर ते सामान्यपेक्षा जास्त आणि सतत होत असेल तर याचा अर्थ प्रोटीन लीकची समस्या निर्माण झाल्याची शक्यता आहे.जे किडनीच्या नुकसानाचे लक्षण आहे.
लघवीचा गडद रंग :
गडद, तपकिरी लघवी देखील धोक्याचे लक्षण असू शकते. याचा अर्थ असा की किडनीची समस्या गंभीर आहे किंवा लघवीतून रक्त बाहेर पडत आहे.
रात्री वारंवार लघवी होणे :
सामान्यतः वारंवार लघवी होणे हे मधुमेहाचे लक्षण मानले जाते. याशिवाय, रात्री अधूनमधून लघवी होणे सामान्य आहे, परंतु जर हे वारंवार होत असेल तर ते मूत्रपिंड निकामी होण्याचे सुरूवातीचे लक्षण असू शकते.
सतत उलट्या होणे :
मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे रक्तातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे अनेक दिवस कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ शकतात.
सतत खाज सुटणे :
उपचारांना प्रतिसाद न देणारी तीव्र, सततची खाज बहुतेकदा
किडनी निकामी झाल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे होऊ शकते.
लघवीतून रक्त येणे :
हे कोणत्याही परिस्थितीत सामान्य नाही आणि ताबडतोब तपासणी केली पाहिजे. कारण याचा अर्थ असा की किडनी इन्फेक्शन, किडनी स्टोन किंवा किडनी फेल्युअरचे हे संकेत आहेत.
हेही वाचा : Health Tips : PCOS साठी 5 उत्तम हर्बल ड्रिंक्स
Edited by – Tanvi Gundaye