स्वयंपाक करणे एक कला आहे. अनेकदा स्वयंपाक एकदम उत्तम रेस्टॉरंट स्टाइल होतो तर कधी बिघडतो. काही वेळा पदार्थ जास्त शिजले जातात तर काही वेळा कच्चे राहतात. त्यामुळे अनेकांना स्वयंपाक करणे कठीण काम वाटते. अशा परिस्थितीत तुम्ही काही सोप्या किचन टिप्स लक्षात घेतल्या तर तुमचाही स्वयंपाक चविष्ट आणि रुचकर तयार होऊ शकतो. जाणून घेऊयात, अशा काही किचन टिप्स ज्यामुळे तुमचा दररोजचा स्वयंपाकही रेस्टॉरंट स्टाइल बनू शकतो.
सोप्या टिप्स –
- कुकरमध्ये भात शिजवताना कुकरच्या भांड्यातून भात उतू जाऊ नये, याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ घालावे याने भात सांडत नाही.
- पदार्थात जर मीठ जास्त किंवा कमी झाले असेल तर लिंबू घालावा. चवीत फरक नक्कीच जाणवेल.
- भाजी बनवताना मॅगी मसाला, छोले मसाला वापरून तुम्ही जेवणाची चव वाढवू शकता.
- तूरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान चव येते. त्यायोगे पालकही खाल्ला जातो.
- कोणताही पुलाव किंवा जिरा राइस, स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तर तांदूळाच्या दीडपट पाणी घाला आणि २ शिट्ट्या कराव्यात. भात मोकळा होतो.
- गोड पदार्थ बनवताना कायम जाड बुडाच्या भांडयात करावे, ज्यामुळे ते करपत नाही.
- खसखस बारीक वाटायची असेल तर १५ मिनीटे आधी पाण्यात भिजत ठेवा.
- नुडल्स मोकळे होण्यासाठी शिजताना त्यात 1 ते 2 थेंब तेलाचे टाकावेत आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून घेऊन थंड पाण्याखाली ठेवावेत.
- बटाटे लवकर उकडण्यासाठी 15 ते 20 मिनीटे पाण्यात भिजत ठेवा. या ट्रिकने बटाटे लवकर उकडतील.
- इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात.
- कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात , तूपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळावेत. फास्ट गॅस फ्लेमवर करू नये.
- गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिक्स केल्यास पोळी भाजताना गूळ वितळून पोळीबाहेर येत नाही आणि पोळ्याही व्यवस्थित होतात.
- भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळावे. या उपायाने भेंडीची भाजी चिकट होत नाही.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde