स्वयंपाक करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. जरी जेवण बनवण्याची पद्धत सारखी असली तरीदेखील प्रत्येकाच्या हातची चव वेगळी असते. म्हणूनच प्रत्येक पदार्थाचा स्वाद हा आपल्याला वेगळा जाणवतो. भाजीच्या ग्रेव्हीचा जरी विचार केला तरी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतींनी ही ग्रेव्ही बनवत असतात. काही जण टोमॅटो बारीक वाटून त्याची पेस्ट भाजीसाठी वापरतात तर काही जण टोमॅटो बारीक चिरुन तेच ग्रेवीकरता वापरतात. खरंतर कुठलाही पदार्थ बनवत असताना वापरण्यात येणारी सामग्री ही अनेकदा सारखीच असते. या सामग्रीमधीलच एक जिन्नस म्हणजे दही. अनेकांना रस्सा असणाऱ्या भाजीमध्ये दही घालून खाणे आवडते. परंतु तुम्हाला माहीत आहे का भाजीच्या ग्रेव्हीमध्ये दही मिसळल्याने काय होते ? आजच्या या लेखातून जाणून घेऊयात भाजीच्या ग्रेव्हीमध्ये दही का आणि केव्हा मिसळावे याविषयी.
भाजीच्या ग्रेव्हीमध्ये दही का मिसळावे ?
भारतीय स्वयंपाक पद्धतींनुसार, ग्रेव्हीचा क्रीमनेस वाढवण्यासाठी, स्वाद वाढवण्यासाठी आणि कधीकधी थोडा आंबटपणा वाढवण्यासाठी दह्याचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त मसाल्यांमधील उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठीही दही भाजीच्या ग्रेव्हीमध्ये मिसळले जाते. यापैकी सगळ्यात सामान्य कारण म्हणजे दह्याचा वापर ग्रेवीला अधिक लज्जतदार बनवण्यासाठी आणि योग्य टेक्स्चर मिळवण्यासाठी केला जातो.
दही केव्हा मिसळावे ?
भाजीमध्ये दही मिसळण्याची योग्य वेळ निवडणे अतिशय गरजेचे आहे. जर योग्य वेळी दही मिसळले गेले नाही तर दही फाटू शकते आणि संपूर्ण पदार्थाचा स्वाद बिघडू शकतो. दही मिसळण्याची योग्य वेळ म्हणजे कांदा आणि टोमॅटो जेव्हा चांगल्या पद्धतीने शिजलेले असतात तेव्हा दही मिसळावे. काही भाज्यांमध्ये दही सर्वात शेवटी टाकले जाते.
दही कसे मिसळावे ?
भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी जर तुम्ही दह्याचा वापर करणार असाल तर जेव्हा तुम्ही दही मिसळाल तेव्हा गॅस बंद करा किंवा गॅस मंद आचेवर ठेवा. जेव्हा दही मिसळाल तेव्हा भाजी उकळत नसावी याची काळजी घ्या. त्याउलट गॅसची आच मंद असावी. जेव्हा तुम्ही भाजीत दही मिसळाल तेव्हा ते तोपर्यंत ढवळत रहा जोपर्यंत दही भाजीत पूर्णपणे नीट मिक्स होत नाही.
हेही वाचा : Kitchen Tips : फ्रीजमध्ये ठेवू नयेत हे पदार्थ
Edited By – Tanvi Gundaye