गेल्या आठवड्यात शनिवारी जगातील सर्वात वृद्ध महिला तोमिको इतूका यांचे निधन झाले. त्या 116 वर्षांच्या होत्या. जपानच्या ह्योगो प्रांतातील नर्सिंग होममध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. 23 मे 1908 मध्ये जन्मलेल्या इतूका यांना डिसेंबर 2023 मध्ये जपानच्या सर्वात वृद्ध महिलेचा दर्जा मिळाला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 117 वर्षीय मारिया ब्रान्यास मोरेरा यांच्या निधनानंतर जगातील सर्वात वृद्ध महिला म्हणून इतुका यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंदवले गेले.
जपान हा देश दीर्घायुषी असणाऱ्या लोकांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, जपानमध्ये 100 वर्षांवरील लोकांची संख्या 95,000 पेक्षा जास्त विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. त्यापैकी सुमारे 90% महिला आहेत.
जपानच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 1 सप्टेंबर 2024 पर्यंत जपानमध्ये 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 95,119 लोक आहेत. त्यापैकी 83,958 महिला आणि 11,161 पुरुष आहेत. मग अशा स्थितीत प्रश्न पडतो की जपानमधील इतके लोक 100 वर्षांपेक्षा जास्त कसे जगतात? आणि या 100 वर्षांहून अधिक जगणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया का जास्त आहेत?
जपानी दीर्घायुष्याचे रहस्य :
जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय हे समजून घेण्यासाठी तोमिको इतूका यांच्या लाइफस्टाइल कडे एक नजर टाकूयात.
गेल्या वर्षी, इतूकाच्या कुटुंबाने एक मुलाखत दिली होती ज्यात
असं म्हटलं होतं की इतूका बऱ्याच वेळा पर्वतांवर सैर करायला जायच्या. त्यांना गिर्यारोहणाची आवड होती आणि वयाच्या 80 व्या वर्षीही त्यांनी गिर्यारोहण केले . इतुका यांनी त्यांच्या आयुष्यात दोनदा ओन्टेक पर्वत चढला आहे. या पर्वताची उंची 10,062 फूट इतकी आहे.
इतूका यांनी वयाच्या 100 व्या वर्षी कोणत्याही आधाराशिवाय जपानमधील आशिया मंदिरावर चढाई केली होती. त्यांना
सकाळी केळी खायला आणि जपानी पेय कॅल्पिस प्यायला आवडायचे. त्यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, इतुका यांना शारीरिक हालचाली करत राहणे आवडायचे. त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही सकारात्मक असायचा. हेच त्यांच्या दीर्घायुषी जीवनाचे रहस्य आहे.
जपानी लोकांच्या दीर्घायुष्यामागे लाल मांस कमी प्रमाणात खाणे, मासे आणि सोयाबीन आणि चहा यांसारखे वनस्पतीजन्य पदार्थ खाणे अशी अनेक कारणे आहेत.
स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त का जगतात?
जागतिक स्तरावर जर आपण पाहिलं तर स्त्रिया पुरुषांपेक्षा 5% जास्त जगतात. परंतु जपानमधील आकडेवारी पाहिल्यास, 100 वर्षांवरील महिलांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा 90 टक्के अधिक आहे.
स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक दीर्घायुषी असण्यामागे अनेक कारणे आहेत. पुरुषांचे सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन देखील यासाठी जबाबदार आहे. टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे पुरुषांमध्ये जाड आवाज आणि छातीचे केस अशी लक्षणे विकसित होतात. तर स्त्रियांचे सेक्स हार्मोन एस्ट्रोजेन त्यांना जास्त काळ जगण्यासाठी मदत करते. या हार्मोनमध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात जे शरीरातील पेशींवर दबाव आणणारी हानिकारक रसायने नष्ट करतात.
महिला आणि पुरुषांच्या जनुकांमधील फरक हेही एक कारण यामागे आहे. महिलांमध्ये दोन X गुणसूत्र असतात. तर पुरुषांमध्ये, एक X गुणसूत्र आणि एक Y गुणसूत्र उपस्थित असतात त्यामुळे जर पुरूषांच्या कोणत्याही एका पेशींने काम करणे थांबवले तर त्यांना आजारी पडण्याचा धोका जास्त असतो, परंतु स्त्रियांकडे दोन सारखीच गुणसूत्रे असल्यामुळे त्यांच्याकडे बॅकअप असतो.
त्याचप्रमाणे काही देशांमध्ये, धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयी पुरुषांमध्ये जास्त दिसतात परंतु महिलांमध्ये हे प्रमाण कमी दिसून येते. स्त्रिया जास्त काळ जगण्याचे हे देखील एक कारण असू शकते.
दीर्घायुष्यासाठी काय करावे ?
अधिक काळ जगण्यासाठी, दररोज प्रशिक्षणासह नियमितपणे व्यायाम करा. एरोबिक व्यायाम करा आणि आठवड्यातून किमान दोन दिवस अधूनमधून उपवास करा, म्हणजे रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये 16 तासांचे अंतर ठेवा.
शक्य तितके चाला, सक्रिय रहा. सकाळी ठराविक वेळेला उठा आणि रात्री ठराविक वेळेत झोपा. रोज शांत ठिकाणी बसून ध्यान करा. नियमितपणे आरोग्य तपासणी करत रहा.
हेही वाचा : Good Sleep : शांत झोपेसाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश
Edited By – Tanvi Gundaye