सिगारेट आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींना फुफ्फुसांच्या कर्करोगाचा सर्वात जास्त धोका असतो. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जे सिगारेटला हातही लावत नाहीत त्यांनाही फुफ्फुसांच्या कर्करोगाची झपाट्याने लागण होऊ लागली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे होऊ शकते, तर याचे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे वायू प्रदूषण. वाढत चाललेल्या प्रदूषणाचा हल्ली फुफ्फुसांवर वाईट परिणाम होत चालला आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झालंय.
धूम्रपान न करणाऱ्यांना फुफ्फुसांचा कर्करोग का होतो?
एका प्रसिद्ध मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ज्यांनी कधीही सिगारेट ओढली नाही त्यांच्यामध्येही फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हा अहवाल जागतिक कर्करोग दिनी म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला . भारत, चीन आणि थायलंड सारख्या आग्नेय आशियाई देशांमध्ये या आजाराच्या अनेक केसेस दिसून येत आहेत. अहवालानुसार, 2022 मध्ये सुमारे 25 लाख लोकांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळून आली आहेत. विशेषतः महिला या आजाराला झपाट्याने बळी पडत आहेत.
2020 ते 2022 पर्यंत फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या 10 पैकी 6 प्रकरणांसाठी अॅडेनोकार्सिनोमा जबाबदार असल्याचे संशोधकांना आढळून आले. अॅडेनोकार्सिनोमा हा एक असा कर्करोगाचा प्रकार आहे जो कफ आणि द्रव साठवणाऱ्या ग्रंथींमध्ये विकसित होतो. फुफ्फुसांचा कर्करोग हा जगभरातील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे पाचवे प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत, प्रदूषणाला बळी पडण्यापासून स्वतःचे शक्य तितके संरक्षण केले पाहिजे.
फुफ्फुसांच्या कर्करोगाची लक्षणे :
सततचा खोकला
छातीत दुखणे
अचानक वजन कमी होणे
श्वास घेण्यात अडचण निर्माण होणे
खोकताना रक्त येणे
लक्षणे कमी करण्यासाठी काही उपाय :
धूम्रपान करणे थांबवा. जर तुम्ही धूम्रपान करत नसाल तर धूम्रपान करणऱ्या व्यक्तींपासून दूर रहा.
आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य व संतुलित आहार घ्या. मुबलक प्रमाणात पाणी प्या.
शारीरिक हालचाली थकवा कमी करायला मदत करतात, मूड सुधारतात. यासाठीच नियमित व्यायाम करा.
तुमच्या शारीरिक आरोग्याव्यतिरिक्त, तुमच्या मानसिक आरोग्य आणि भावनिक गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या सल्लागाराशी किंवा इतर कर्करोग रुग्णांशी बोलू शकता ज्यांना तुम्ही काय अनुभवत आहात हे समजते.
हेही वाचा : Travelling Tips : गुगल मॅपचा वापर करताना बाळगा ही सावधगिरी
Edited By – Tanvi Gundaye