कोणताही सणसमारंभ असला किंवा कार्यक्रम असला की महिलांच्या मनात पहिल्यांदा विचार येतो तो म्हणजे दागिने कुठले घालावेत ? महाराष्ट्रीय दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. दागिन्यांमध्ये नथ ही तर नखरेबाज असते. आणि प्रत्येक स्त्रीला ती परिधान करण्याची इच्छाही होतेच. नव्या नवरीला मराठमोळा राजेशाही आणि शोभिवंत लूक देणाऱ्या या नथीला महाराष्ट्राच्या काही भागात ‘मुखडा’ असंही म्हणतात. या नथींच्या रंगात, साहित्यात आणि गुणवत्तेतही आपल्याला विविधता दिसून येते.
मासोळी नथ :
माशाच्या आकारासारखी असणाऱ्या या नथीला मासोळी नथ असे म्हणतात. या नथीचा आकार गोलाकार झालेल्या माशासारखा असतो. यामध्ये मेटल अधिक प्रमाणात असते. तर मोती किंवा खडे फारच कमी असतात. बाजारात बेंटेक्स किंवा ऑक्सिडाईज अशा प्रकारामध्ये या नथी मिळतात. गुलाबी, हिरव्या रंगाच्या खड्यांची यामध्ये गुंफण केलेली असते.
पेशवाई नथ :
पेशवाई ही संस्कृती, कला आणि सर्जनशीलतेसाठी देखील ओळखली जाते. महाराष्ट्रात सर्वात जास्त परिधान केल्या जाणाऱ्या नथीमध्ये पेशवाई नथीचे नाव घेतले जाते. कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांवर ही नथ शोभून दिसते. पण जर तुम्ही मोत्याचे दागिने परिधान केले असतील तर पेशवाई नथ तुम्हाला एक खास लूक देऊ शकते.
बानू नथ :
ही नथ पौराणिक टीव्ही मालिका ‘जय मल्हार’मध्ये आपण पाहिली असेल. बानू या व्यक्तिरेखेसाठी तयार करण्यात आलेली ही नथ प्रेक्षकांच्या चांगलीच मनात भरली. या नथीला खड्याचा एकच थर असून हिच्या तळाशी मोती टांगलेला असतो. या नथीच्या वेगळ्या रचनेमुळे सध्या अनेक मुलींनी अशा नथींच्या डिझाईन घालायला सुरुवात केली आहे. ही नथ सामान्य महाराष्ट्रीय नथांपेक्षा थोडी लहान असते. त्यामुळे अनेकजणी या नथीला खास पसंती देताना दिसतात.
कारवारी नथ :
कारवारी नथेची रचना देखील काहीशी बानू नथेसारखीच आहे. ही नथ महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील संस्कृती आणि परंपरा यांचा संगम आहे. कर्नाटकातील कारवार गावावरून हे नाव या नथीला पडले असावे. या नोज रिंगच्या डिझाईनलाही थोडासा दक्षिणात्य टच असतो. या नथीवर सोन्याचा मुलामा असलेले मोती किंवा साधे मोती असतात. ही नथ क्वचितच उपलब्ध होते.
कोल्हापुरी नथ :
कोल्हापुरी नथ ही महाराष्ट्रातील प्रचलित अशा नथींच्या प्रकारांपैकी एक आहे. अर्धगोल मोत्यांची गुंफण करुन हा दागिना घडवला जातो. यामध्ये मोतीच्या दोन सरी किंवा एक सर असते. नथीच्या वरच्या भागावर मोर किंवा एखादा खडा असतो.
मोरणी नथ :
मोरणी नथ ही देखील हल्ली खूपच प्रसिद्ध झालेली नथ आहे. यामध्ये छान बाकदार मोर असतो. या मोराच्या आकाराप्रमाणे नथीचा आकार ठरत असतो. जर तुम्ही मोरणी नथ कधी पाहिली असेल तर तुम्हाला यावर केलेले बारीक कामदेखील नक्की आवडेल. या नथीमध्ये धातूचा वापर अधिक असतो. त्यामध्ये गुलाबी रंगाचे किंवा अमेरिकन डायमंड बसवलेले असतात. त्यामुळे ही नथ खूपच भरगच्च आणि सुंदर दिसते.
मराठा नथ :
नथीचा हा प्रकारही खूप जणांना माहीत असेल. मराठा नथ ही फारच प्रसिद्ध अशी नथ आहे. मराठा नथीचे वैशिष्ट्य असे की,या नथीमध्ये एक गोलाकार बाक असतो. त्यावर मोती असतात. नथीच्या वरच्या आणि ओठांकडील बाजूला मोत्यांपासून बनवलेली फुलं असतात.
काशीबाई नथ :
राणी काशीबाई यांच्या नावाने प्रसिद्ध असलेली ही नथ सगळ्यांनाच माहीत असेल. काशीबाई नथ ही दिसायला भरगच्च दिसते. या नथीला मोत्याचे आणि खड्यांचे कोंदण केलेले असते. बाजीराव मस्तानी चित्रपटानंतर ही नथ मोठ्या प्रमाणात सगळीकडे मिळू लागली आहे.
या प्रकारांव्यतिरिक्त ब्राम्हणी नथ, वऱ्हाडी नथ, सरजाची नथ, येसूबाई नथ अशाहूी काही नथी बाजारात उपलब्ध आहेत.
हेही वाचा : fashion tips : डेनिम जीन्सला द्या न्यू लूक
Edited By – Tanvi Gundaye