घरताज्या घडामोडीआहार भान: संक्रांत स्पेशल मिक्स भाजी - उकड हंडी

आहार भान: संक्रांत स्पेशल मिक्स भाजी – उकड हंडी

Subscribe

संक्रांत म्हटले म्हणजे तिळाचे लाडू , गूळ पोळी, तेल पोळी. संक्रांतीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी केली जाणारी मिक्स भाजी- भोगीची भाजी / गुजराती उंधियु / अलिबाग पट्ट्यातील पोपटी किंवा पालघर जिल्ह्यातील उकड हंडी अशी या भाजीची अनेक नावे. ऋतूनुसार असणारी शरीराची आहाराची गरज, उपलब्ध असणाऱ्या भाज्या आणि सण यांची उत्तम सांगड म्हणजे ही संक्रांतीला करण्यात येणारी मिक्स भाजी.

हिवाळ्यात जितक्या म्हणून विविध भाज्या मिळतात त्या सर्व घालून ही भाजी करायची. गुजराती उंधियु बराच तेलकट आणि मसालेदार असते. अलिबाग / पालघरला पोपटी मातीच्या मडक्यात करतात. ते आपल्याला शक्य नाही. आपण ही भाजी कमीत कमी तेल वापरून, कमी मसाले वापरून, भाज्यांचा मूळ स्वाद ठेवून कुकरमध्ये करुया.

- Advertisement -

साहित्य

  • विविध प्रकारच्या घेवड्याच्या शेंगा
  • कोनफळ
  •  रताळे
  •  नवलकोल
  •  पातीचे कांदे
  •  विविध प्रकारची वांगी
  •  तुरीच्या शेंगा
  •  वालाच्या शेंगा
  •  शेवग्याच्या शेंगा
  •  ताजा खोवलेला नारळ – १ कवड
  •  भिजवलेले कच्चे शेंगदाणे – १ मोठी वाटी
  •  धने जिरे पावडर- ५-६ चमचे
  •  मिरची पावडर
  • हळद
  •  मीठ
  •  तेल – मोठे ४-५ चमचे
  •  तीळ – ३ मोठे चमचे

कृती

- Advertisement -

१. बाजारातून जितक्या प्रकारच्या घेवड्याच्या शेंगा, वांगी, कोनफळ मिळतील तितक्या थोड्या थोड्या आणाव्यात.
२. सर्व भाज्या धुवून, साफ करुन घ्याव्यात. वालाच्या, तुरीच्या शेंगांचे गोळे काढावेत. घेवाड्याच्या शेंगांचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. तसेच रताळे, कोनफळ, नवलकोल यांच्या सालि काढून मध्यम आकाराचे तुकडे करावेत.
३. एका मोठ्या परातीत या सर्व कापलेल्या भाज्या घ्याव्यात. त्यात तेल, हळद, धने जिरे पावडर, एक छोटा चमचा हिंग, मिरची पावडर, मीठ, तीळ, भिजवलेले शेंगदाणे, खोवलेले ओले खोबरे घालावे आणि चांगले मिक्स करावे.
४. अर्धा-एक तास बाजूला ठेवावे म्हणजे मसाले चांगले मुरतात.
५. एक तासाने एक पसरट कुकर घ्यावा. त्याच्या बुडाशी एक किंवा दोन केळीची पाने ठेवावीत. त्यावर थोडे तेल घालावे.
६. या पानांवर सर्व भाजी घालावी. कुकरमध्ये कडे कडेने एक चमचाभर पाणी घालावे. जास्त पाणी घालू नये. भाजीची चव बिघडते.
७. कुकराचे झाकण लावावे. शिटी पण लावावी. गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
८. वाफ भरून शिटी सू सू करू लागली की गॅस मंद करावा. शिटी होऊ देवू नये.
९. २० मिनिटे मंद गॅसवर भाजी शिजू द्यावी. यादरम्यान करापल्याचा वास आला तरी घाबरु नये. खालची केळीची पाने करपतात.
१०. २० मिनिटांनी गॅस बंद करावा. अर्ध्या तासाने कुकर उघडावा.

ही भाजी कधीच मोजकी होवू शकत नाही. शेजारी पाजारी, मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांना वाटूनच खावी. वरणभात, ज्वारी बाजरी किंवा तांदळाची भाकरी याबरोबर खावी किंवा कुकर उघडल्यावर जो भाज्यांचा स्वर्गीय परिमळ येतो त्याने वेडे होवून नुसती खावी. निसर्गाचे देणे आहे ते. कृतज्ञेने खावे.

डॉ.ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -