ज्या काळात महिला घराबाहेरही पडत नव्हत्या त्या काळात शिक्षण घेणे ही तर दूरचीच गोष्ट पण असं असतानाही प्रचंड कष्ट आणि आवड व इच्छाशक्तीच्या जोरावर संशोधन करणारी महिला होऊन गेली. तिचं ज्ञान, संशोधन हे विज्ञान जगतात एक मैलाचा दगड ठरलं. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अशा दोन वेगवेगळ्या विषयात दोन नोबेल पारितोषिकं मिळवून तिने इतिहास रचला. मेरी क्युरीचा जन्म पोलंडच्या वॉर्सामधील एका शाळाशिक्षकाच्य घरी झाला. तिचं मूळ नाव मारिया ऊर्फ मान्या. हुशार आणि तल्लख बुद्धिमत्ता असलेली मान्या शालेय अभ्यासात नेहमीच अग्रेसर असायची.
खूप शिकावं ही तिची लहानपणापासूनची इच्छा! पण यामध्ये एक अडथळा होता तो म्हणजे पोलंडमधील विद्यापीठात मुलींना प्रवेशच नव्हता. तिच्या मोठ्या बहिणीला म्हणजेच ब्रोनीलाही उच्चशिक्षण घ्यायचं होतं. मग मान्या आणि ब्रोनीने एक करार केला तो असा की आधी मोठ्या बहिणीने म्हणजे ब्रोनीने परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं आणि मारियाने त्यासाठी मायदेशात राहून नोकरी करायची व मिळतील ते पैसे बहिणीला पाठवायचे. ब्रोनीचं शिक्षण झालं की तिने मायदेशी परत यायचं आणि मारियाला परदेशी पाठवून तिच्या शिक्षणासाठी तिला मदत करायची. या करारानुसार, 1891 ला मारिया पॅरिसला गेली. त्या विद्यापीठात गेल्यावर मारियाने आपलं नाव मेरी असं रजिस्टर केलं आणि मारियाची मेरी क्युरी झाली. वसतिगृहातील तिचे दिवस खूपच हलाखीचे होते. केवळ ब्रेड, बटर खाऊन तिला तिची उपजीविका करावी लागे. ती मुलगी असल्याने तिला सर्वसामान्य प्रयोगशाळा वापरण्याचीही परवानगी नव्हती. तिच्यासाठी देण्यात आलेल्या मोडक्या प्रयोगशाळेत ती न थकता काम करत राही.
पॅरिसला प्रोफेसर लीपमन यांच्याबरोबर काम करत असताना तिची भेट फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पीयर क्युरी याच्याशी झाली. 1895 साली त्या दोघांनीही लग्न केले. त्याचवर्षी जर्मन शास्त्रज्ञ रंटेजन याने एक्स-रे चा शोध लावला होता. त्याच्या कामामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काही रसायनामधून विशिष्ट पद्धतीला बाहेर पडत होते हे त्याच्या लक्षात आलं. त्या कामाचा मेरी वर खूपच प्रभाव पडला होता. दरम्यान, हेन्री ब्रेहकेल या शास्त्रज्ञाने युरेनियम मधून काही रेडिएशन्स कसे बाहेर पडतात हे पाहिलं होतं. त्यामुळे मेरीची उत्सुकता अजूनच वाढली. मग तिने काही टेस्ट करायच्या ठरवल्या. तिने पिंचब्लेड या रसायनावर काही प्रयोग केले. आणि अथक परिश्रमानंतर तिला त्यातून रेडिओऍक्टिव्ह मूलद्रव्यं सापडली. ती म्हणजे पोलोनियम आणि रेडियम.
1903 मध्ये मेरीला पीयर आणि ब्रेहकेल यांच्याबरोबर रेडिओऍक्टिव्हिटीच्या शोधासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं. नंतर 1911 मध्ये रेडियम, रेडियमची कंपाऊंड आणि रेडियमच धातूसदृश रूपं शोधल्याबद्दल तिला रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालं. मेरीला नोबेलची मिळालेली रक्कम तिने पोलंड मधील गरीब लोकांना दान केली. खरंतर ज्यावेळेस मेरी रेडिओऍक्टिव्हिटी वर काम करत होती त्यावेळेस त्याचे दुष्परिणाम कोणालाच माहीत नव्हते. मेरी तर त्या मूलद्रव्यांच्या टेस्ट ट्यूब खिशात घेऊन फिरत, रात्री झोपताना बाजूला कपाटाच्या ड्रावर मध्येही ठेवत असे. याचा परिणाम असा झाला की रेडिओऍक्टिव्हिटीच्या अतिवापरामुळे तिला ल्युकेमिया कॅन्सर झाला. आणि त्यात ती मरण पावली. मात्र असं जरी असलं तरी तिच्या विज्ञान जगतातील अतुलनीय कामगिरीमुळे आजही ती अनेक संशोधकांसाठी प्रेरणास्थान आहे.
हेही वाचा : Fashion Tips : या टिप्सच्या मदतीने निवडा परफेक्ट फूटवेअर
Edited By – Tanvi Gundaye