डाळभात किंवा डाळरोटी हे भारतातील प्रमुख अन्न आहे. घरात कोणतीही भाजी नसेल तर डाळभात खाण्याकडेच लोकांचा मुख्य कल असतो. डाळभात हा पोट भरण्यासोबतच शरीराला पोषण देण्याचेही काम करतो. डाळींचे अनेकविध प्रकार आहेत. प्रत्येक डाळीमध्ये प्रोटीन्स, फायबर आणि अन्य पोषक तत्त्वे असतात. काही डाळींमध्ये इतक्या प्रमाणात प्रोटीन आढळतं की चिकन, मटण असे जास्त प्रोटीन्ससाठी ओळखले जाणारे पदार्थही फिके पडतात. एक्स्पर्टसच्या म्हणण्यानुसार, मूगडाळीमध्ये सगळ्यात अधिक प्रमाणात प्रोटीन्स आढळतात. परंतु काही जणांना मूगडाळ खाणे फारसे आवडत नाही. अशावेळी प्रोटीन्सचा दुसरा ऑप्शन म्हणजे मसूर डाळ. जर तुम्ही शाकाहारी असाल तर प्रोटीन्सची पूर्तता करण्यासाठी तुम्ही मसूर डाळीचे सेवन निश्चितच करू शकता. जाणून घेऊयात मसूर डाळीमध्ये असलेल्या पोषक तत्त्वांविषयी आणि त्याच्या फायद्यांविषयी.
मसूरमध्ये असलेले पोषक घटक
मसूर डाळीत असणारे प्रोटीन्स केवळ शरीरातील प्रथिनांची कमतरता भरून काढत नाहीत तर यामध्ये जीवनसत्त्वे आणि इतर खनिजेही भरपूर प्रमाणात असतात. प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.त्यात पोटॅशियम, फायबर, लोह, व्हिटॅमिन बी 6,मॅग्नेशियम, फोलेट इत्यादी असतात.
मसूरचे फायदे (लाल मसूर फायदे)
– मसूर हा नैसर्गिक प्रथिनांचा स्रोत आहे. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल किंवा नियंत्रित ठेवायचे असेल तर तुम्ही मसूर खाऊ शकता. हे खाल्ल्याने तुम्हाला बराच वेळ भूक लागणार नाही आणि तुम्ही जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाणे देखील टाळाल.
-यामध्ये पोटॅशियम आणि फायबर असल्याने, ते हृदयासाठी देखील सर्वोत्तम आहे. यामुळे रक्तदाब नॉर्मल राहतो.
– यामध्ये कॅलरीज कमी आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी याचे सेवन केले जाऊ शकते.
– यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते.
– फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्हाला त्यातूनही आराम मिळू शकतो. तुम्ही मसूर सूप बनवून त्याचे सेवन करू शकता. यामुळे पचनाच्या समस्या होणार नाहीत. आतड्यांसंबंधी आजारांपासूनही संरक्षण मिळू शकेल.
हेही वाचा : Weight Loss : वेट लॉसमध्ये डिटॉक्स वॉटर फायदेमंद
Edited By – Tanvi Gundaye