मासिक पाळीदरम्यान अनेक वेळा महिलांना असह्य वेदना होतात. पोट, कंबर, पाय आणि डोकेदुखीच्या समस्यांमुळे दैनंदिन कामंही करणे कठीण होते. मासिक पाळीच्या दुखण्यामागे अनेक कारणे असू शकतात. दर महिन्याला तीव्र वेदना होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. खरंतर मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी महिला अनेकदा ओव्हर-द-काउंटर पेनकिलर्स घेतात. पण, दर महिन्याला पेन किलर घेणे सुरक्षित आहे का की यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते हेच आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.
मासिक पाळीच्या वेदनांसाठी पेनकिलर घेणे योग्य आहे का?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मासिक पाळी दरम्यान वेदनाशामक औषधे योग्य प्रकारे आणि मर्यादित प्रमाणात घेतल्यास ते सुरक्षित आहे.
साधारणपणे, या दिवसात वेदना कमी करण्यासाठी नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधे वापरली जातात. ही औषधे शरीरातील प्रोस्टॅग्लँडिनचे उत्पादन कमी करतात.
हे एका संप्रेरकासारखेच आहे, ज्यामुळे गर्भाशयाच्या स्नायूंचे आकुंचन होते आणि यामुळे पीरियड क्रॅम्प्स कमी होतात.
परंतु ही औषधे घेताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या डोसपेक्षा जास्त पेनकिलर्स घेऊ नका.
ही औषधे हाय डोसमध्ये किंवा वैद्यकीय सल्ल्याशिवाय दीर्घकाळ घेतल्यास पोटदुखी, अल्सर आणि किडनीच्या समस्या होऊ शकतात.
जर तुम्हाला ओव्हर-द-काउंटर औषधांमुळे आराम मिळत नसेल किंवा तुम्हाला दमा, गॅसची समस्या किंवा किडनीचा आजार असेल तर ही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काही लोकांना हीट पॅड, योगासने किंवा औषधांऐवजी मॅग्नेशियम सप्लिमेंट्स वापरून आराम मिळू शकतो. हे प्रत्येकासाठी वेगळे असू शकते. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
जर तुम्हाला दर महिन्याला तीव्र वेदना होत असतील किंवा वेदनेसोबत हेवी फ्लो आणि अनियमित मासिक पाळी येत असेल, तर केवळ वेदनाशामक औषधे घेणे हा उपाय असू शकत नाही.
अशा परिस्थितीत, तुमची स्थिती ही फायब्रॉइड्स किंवा एंडोमेट्रिओसिस सारखी असू शकते. कधीकधी हे हार्मोनल इंम्बॅलेन्समुळे देखील होते . त्यामुळे डॉक्टरांकडून नक्कीच तपासणी करून घ्या.
मासिक पाळीच्या दुखण्यामागे अनेक कारणे असू शकतात. या दिवसांत तीव्र वेदना होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
हेही वाचा : Rose Tea Benefits : चमकदार त्वचेपासून वेट लॉससाठी फायदेशीर रोझ टी
Edited By – Tanvi Gundaye