महिलांनी मासिक पाळीच्या काळात स्वत:च्या शारीरिक स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. हे केवळ त्यांच्या शरीरासाठीच महत्त्वाचे नाही तर त्यांच्या आरोग्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण या काळात अॅलर्जी आणि संसर्गाचा धोका असू शकतो. मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या पद्धती सर्वांना माहित असणे आवश्यक आहे कारण त्याच्याशी संबंधित अनेक गैरसमज आहेत. म्हणूनच, आज जाणून घेऊयात मासिक पाळीच्या स्वच्छतेशी संबंधित काही मूलभूत गोष्टींविषयी. ज्या जाणून घेतल्याने तुम्हाला मासिक पाळीच्या दरम्यान ताजेतवाने वाटेलच आणि एक वेगळा आत्मविश्वासही निर्माण होईल.
मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी टिप्स-
मासिक पाळीच्या वेळी तुम्ही कापसाचे सॅनिटरी नॅपकिन्स किंवा टॅम्पोन्स निवडू शकता कारण ते तुमच्या त्वचेसाठी मऊ असतात, त्यामुळे खाज सुटत नाही आणि पुरळही येत नाही. याशिवाय, तुम्ही पीरियड कप देखील वापरू शकता कारण ते सिलिकॉनपासून बनलेले असून पर्यावरणपूरक देखील असतात आणि त्वचेला हानीही पोहोचवत नाहीत.
– काही महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या 2-3 दिवसांत जास्त रक्तस्त्राव होतो, ज्यामुळे त्या कपड्यांवर डाग पडू नये म्हणून दोन सॅनिटरी पॅड वापरतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की असे केल्याने तुमच्या गुप्तांगांमध्ये संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून एकच पॅड वापरा.
– मासिक पाळीच्या वेळी गुप्तांग धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. दर 4 तासांनी सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पोन बदला. प्रवास करताना कोणतीही अस्वस्थता टाळण्यासाठी पॅड किंवा टॅम्पोन नेहमी सोबत ठेवा.
– तुमच्या त्वचेला श्वास घेण्यास मदत करणारे आणि संसर्ग रोखणारे कम्फर्टेबल सुती अंडरवेअर निवडा. जर तुम्हाला जननेंद्रियाच्या भागात किंवा त्याच्याजवळ पुरळ वा संसर्ग जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. सैलसर सुती कपडे निवडा.
– तसं पाहायला गेलं तर सामान्य दिवसातही भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण मासिक पाळीच्या वेळी पुरेसे पाणी पिऊन नेहमी स्वतःला हायड्रेट ठेवा. जर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या असेल तर पाणी तुमचे फुगणारे पोट कमी करण्यास आणि बरे वाटण्यास तुम्हाला मदत करेल. पण हे लक्षात ठेवा की थंड पाणी पिणे टाळा आणि कोमट पाणी वापरण्याचा प्रयत्न करा.
– मासिक पाळीच्या काळात शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे महत्वाचे आहे. चालणे किंवा योगा करणे यांसारखे हलके व्यायाम करून पहा. त्याच वेळी, जड वजन उचलण्याची आवश्यकता असलेले व्यायाम करणे टाळा, जेणेकरून तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत.
– दिवसातून कमीत कमी दोनदा आंघोळ करा आणि जननेंद्रियाचा भाग स्वच्छ ठेवा. वॉशरूम वापरल्यानंतर किंवा पॅड बदलल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवा. तसेच, गुप्तांगांमध्ये कोणतेही रासायनिक उत्पादन वापरू नका.
– तुमचे गुप्तांग स्वच्छ करताना, ते समोरून मागे धुतले जात असण्याची काळजी घ्या. जेव्हा मागून पुढच्या बाजूला स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा योनीमार्गात हानिकारक बॅक्टेरिया पसरण्याचा धोका निर्माण होतो ज्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो.
हेही वाचा : Fashion Tips : उंचीने लहान असलेल्या मुलींसाठी हे ड्रेस बेस्ट
Edited By – Tanvi Gundaye