घरलाईफस्टाईलपावसाळ्यात वाढतोय डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आजारांचा धोका; 'या' ६ टिप्स वापरून रहा...

पावसाळ्यात वाढतोय डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आजारांचा धोका; ‘या’ ६ टिप्स वापरून रहा सुरक्षित

Subscribe

पावसाळा सुरु होताच सगळीकडे साथीच्या आजारांचा संसर्ग वाढण्यास सुरुवात होते. कारण यावेळी वातावरणात मोठ्याप्रमाणात बदल होत असतात. या बदलांशी आपल्या शरीराला जुळवून घ्यावे लागते. जेव्हा शरीर या बदलांना प्रतिकूल प्रतिसाद देते तेव्हा ताप, सर्दी, खोकला यांसारख्या सामान्य आजारांचा सामना करावा लागतो. याशिवाय पावसाळ्यात जंतू आणि विषाणूपासून होणाऱ्या आजारांचा धोकाही वाढतो. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या तापाच्या साथीमुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांचा मृत्यू होतो. त्या आजारांना व्हायरल इंफेक्शन असे म्हटले जात असून जे एडीस एजिप्टी नामक डासांमुळे पसरतात. हे डास घरगुती वातावरणात आणि आजूबाजूच्या परिसरात साचलेल्या पाण्यात अधिक वाढतात. परंतु या आजारांपासून आपले संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. मात्र यंदा पुढील सहा टिप्सचा वापर करत या आजारांपासून सुरक्षित रहा. चला तर पाहूया काय आहेत या टिप्स!

सूर्यास्तापूर्वी दारे, खिडक्या बंद करा

जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा पावसाचा पुरेपर आनंद घेण्यासाठी घरातील बरेच जण दारे, खिडक्या उघडी ठेवतात. परंतु पावसाळ्यात सूर्यास्तापूर्वी किंवा काळोख होण्यापूर्वी घरातील दारे, खिडक्या बंद कराव्यात. कारण हे घातक डास सूर्यास्तादरम्यान अधिक सक्रिय असतात.

- Advertisement -

फुल साइजचे कपडे वापरा

एडीस एजिप्टी डास कोणत्याही वेळी शरीरावर आक्रमण करु शकतात. त्यामुळे पावसाळ्यात या डासांपासून वाचण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे घरात असताना किंवा घराबाहेर पडताना शरीर पूर्ण झाकले जाईल असे कपडे वापरा. यासाठी तुम्ही फुल स्लीव्हज शर्ट, कुर्ता, फुल पॅन्ट, पायजमा इ. कपड्यांचा वापर करु शकता. तसेच मुलांनाही फूल स्लीव्ह असलेले कपडे वापरण्यास सांगा. यासाठी पालकांनी विशेष लक्ष द्यावे. शरीर जितके जास्त झाकले जाईल तितके आपण डासांपासून सुरक्षित राहू शकतो.

झोपताना मच्छरदाणीचा वापरा करा

पावसाळ्यात घराबाहेर अनेक ठिकाणी पाणी साचून राहते. या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास मोठ्याप्रमाणात होते. त्यामुळे या डासांपासून बचाव करण्यासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. गंभीर आजार पसरवणाऱ्या डास आणि किटकनाशकांपासून वाचण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. परंतु ती मच्छरदाणी कुठूनही फाटली नाही ना याची काळजी घ्या.

- Advertisement -

आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा

पावसाळ्यात डासांची पैदास रोखण्यासाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. तसेच घरातही साफसफाई ठेवा. कारण साचलेल्या पाण्यात डास मोठ्याप्रमाणात पसरतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी साचत नाही याची खात्री करुन घ्या. तसेच घरातील कूलर किंवा टेरेसवर पाणी साचत असल्यास ते नियमित स्वच्छ करा. तसेच सभोवतालच्या परिसरात डासांना रोखणाऱ्या औषधांची फवारणी करा.

आहाराकडे लक्ष द्या

या आजारांमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात कमी होते. ताप, सर्दी, खोकला सतत कमी जास्त होत असल्याने अंथरुणावरून उठणेही अनेकदा अडचणीचे वाटते त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याकडे लक्ष द्या. यासाठी आहारात पौष्टिक पदार्थ, ताजी फळे, पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्या जास्त प्रमाणात असाव्यात. यासह तुम्ही भरपूर पाणीही प्यावे.

आरोग्य विमा योजना असणे गरजेचे 

डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारखे विषाणूजन्य आजार पावसाळ्यात दरवर्षी पसरतात. या आजारांचा प्रभाव खेड्यांपासून ते अगदी मोठ्या शहरांमध्येही दिसून येतो. या आजारांमुळे शरीरावर होणारे गंभीर परिणाम पाहता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. वरील टीप्स तुम्हाला आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतील, पण याव्यतिरिक्त आजार झाल्यास आपल्याकडे आरोग्य विमा असणेही तितकेच गरजेचे आहे. कारण या विम्यामुळे तुम्हाला आजारांवर उपचार करताना रुग्णालयाचा आणि औषधांचा खर्च करताना मोठी मदत होते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -