एका तासात होणार ‘टीबी’ चे निदान, नवी प्रणाली विकसित

TB
(फोटो प्रातिनिधिक आहे. )

बातमीचं शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. कारण मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्युटने टीबीचे निदान अवघ्या तासाभरात आणि परवडणाऱ्या दरात मिळण्यासाठी एका नव्या प्रणालीचा शोध लावला आहे. ही संशोधन प्रक्रिया तिसऱ्या टप्प्यात असून लवकरच ती वापरात आणता येईल, असा विश्वास हाफफिन इन्स्टिट्युटकडून व्यक्त करण्यात आला आहे.

टीबीच्या रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता हाफकिनने या नव्या निदान प्रणालीचा शोध लावला आहे. वर्षाला साधारण २ लाखांहून अधिक लोकांना टीबीची बाधा होते. ‘अश्युअर्ड डायग्नॉस्टिक’ असे या नव्या निदान प्रणालीचे नाव आहे.
टीबीचे निदान होण्यासाठी यापूर्वी किमान ३ आठवड्यांचा कालावधी लागत होता. कारण थुंकी आणि रक्त तपासणीचा अहवाल येण्यासाठी बराच वेळ जात होता. शिवाय अनेक रुग्णालयांमध्ये या तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. शासकीय रुग्णालयांमध्ये ही तपासणी मोफत केली जाते. त्यामुळे साहजिकच या रुग्णालयांवर अधिक भार असतो. खासगी रुग्णालयांमध्ये २००० ते २५०० रुपये शुल्क आकारून चाचणी केली जाते. ज्यातून टीबीचे अचूक निदान केले जाते. पण त्यासाठी किमान २ दिवसांची वाट पाहावी लागते. हा खर्च अनेकांना परवडत नाही. त्यामुळे मोफत चाचणी करुन देणाऱ्या शासकीय रुग्णालयात जाऊनच चाचणी करण्यास प्राधान्य दिले जाते.

हाफकिनचे संशोधन कार्य सध्या अंतिम टप्प्यात असून यासाठी ९० लाखांचा निधी देखील सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच ही नवी निदान प्रणाली उपलब्ध होईल, अशी आशा हाफकिनकडून व्यक्त करण्यात आली आहे.

कसा होतो टीबी?

टीबी हा ‘ मायक्रोबॅक्टीरिअम’या जंतूमुळे होते. हा संसर्गजन्य रोग असून याचा परिणाम सगळ्यात आधी फुफ्फुसांवर होतो आणि मग तो शरीरात पसरत जाऊन मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो.

 

टीबीची लक्षणे

  • खोकला, ताप येणे
  • भूक मंदावणे
  • वजन कमी होणे
  • प्रतिकारशक्ती कमी होणे