ऑफिसमध्ये कशी असायला हवी तुमची बॉडी लँग्वेज?

ऑफिसमध्ये असताना शिस्त गरजेची असतेच. तसेच तुम्ही कसे बोलता, वागता उठता बसता एवढेच नाही तर एखाद्या प्रसंगावर तुम्ही कसे रिअॅक्ट होता? काय कपडे घालता हे देखील महत्वाचे असते. कारण तुमची हीच बॉडी लॅग्वेज म्हणजे तुमची देहबोली तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे ते सांगत असते. पण त्यासाठी काही चूका आपल्याला टाळता आल्या पाहीजेत. कारण आपल्या याच गोष्टींवरून करियर घडत असतं.

खांदे वाकवून उभे राहणे

आत्मविश्वासी व्यक्ती ही नेहमी मजबूत विचारांची असते. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता ती त्यावर मात करते. यामुळे अशा व्यक्ती चारचौघातही उठून दिसतात. त्यांच्या देहबोलीतून त्यांचा आत्मविश्वासही प्रतित होत असतो.

पण याऊलट ज्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो त्या नेहमी मान खाली झुकलेल्या अवस्थेत खांदे वाकवूनच वावरत असतात. यामुळे अशा व्यक्तींवर सहसा कोणी विश्वास ठेवत नाहीत. त्यावर जबाबदारी देण्यास कोणीही उत्सुक नसते. तसेच या देहबोलीवरून समोरच्याला कामात रस नाही असाही समज होतो.

तसेच ज्यावेळी कोणी तुमच्याशी बोलत असेल तेव्हा इकडे तिकडे बघू नये. त्याच्या डोळ्याला डोळा भिडवत बोलावे. अन्य़था तुम्हांला त्यांचे बोलणे ऐकण्यात काहीच रस नसल्याचे समोरच्याला वाटू शकते.

सहकाऱ्यांच्या अंगलट करत उभे राहणे

बऱ्याचवेळा अनेकजण समोरच्याला आपले बोलणे नीट ऐकू यावे यासाठी त्याच्या अगदी जवळ जाऊन बसतात किंवा उभे राहतात. पण अशी देहबोली ही उथळ विचारधारा असलेल्यांची मानली जाते.

तसेच जर समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलत असेल आणि तुम्ही मात्र लॅपटॉप , मोबईलमध्ये डोके खुपसून असाल तर ते तात्काळ थांबवा. कारण तुमची ही बॉडी लँक्वेज तुम्ही बेफिकीर आहात असा मेसेज देते. कामाप्रती तुम्ही सिरियस नसून समोरच्या व्यक्तीच्या बोलणे ऐकण्यातही तुम्हाला रस नसल्याचे त्यातून प्रतित होते.

बोलताना सतत हातापायांची हालचाल करणे
काहीजणांना एका जागी शांत राहणे शक्य नसते. कितीही गंभीर मुदद्यावरून चर्चा सुरू असली तरी अशा व्य्कती सतत चुळबुळ करत असतात. कधी पाय हलवतात तर कधी सतत हातवारे करतात. त्यामुळे तुम्हांला कसलीच शिस्त नसल्याचे यातून दिसलते. अशावेळी तुम्हांला काम मिळणेही कठीण होते.

च्युईंगम खाणे
जेव्हा तुम्ही मिटींग किंवा एखाद्या गंभीर विषयावर कोणाशीही बोलत असता किंवा ऐकत असता अशावेळी च्युईंगम किंवा कुठलाही पदार्थ चघळत राहणे हे तुमचे उद्दाम वागणे दाखवते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीलाही तुमच्याशी बोलताना स्वारस्य राहत नाही. तुम्ही चर्चिले जाणाऱ्या विषयात गंभीर नाही असे समजले जाऊ शकते. करियरच्या दृष्टीने तुमचे नुकसान होऊ शकते.

मोठ्याने बोलणे
ऑफिसमध्ये किंवा चारचौघात वावरताना बोलताना तारतम्य ठेवावे लागते. जर तुम्हांला जोरात ओरडून बोलण्याची सवय असेल तर तुम्हांला बेशिस्त समजले जाते. यामुळे मोठ्याने ओरडून बोलू नये. जे काही बोलायचे ते शांतपणे समजवून सांगावे किंवा बोलावे.