Monday, October 2, 2023
घर मानिनी Relationship दहा वर्षांनंतर तू कुठे असशील?

दहा वर्षांनंतर तू कुठे असशील?

Subscribe

ते 1972 साल होतं.नव्यानेच शाळेच्या अभ्यासात बीजगणित, भूमिती असे दोन विषय आले.आधीच अंकगणितातले पाण्याचे हौद किती वेळात भरतील ते काळ,काम यांचं गणित सोडवता सोडवता घाम फुटायचा,वडिलांसमोर प्रगतीपुस्तक घेऊन जाताना ह्रदय धडधडायचं,रडूच यायचं,सारखं स्वप्न पडायचं गणिताचा पेपर आहे आणि आपल्याला काही येत नाहीय.कोणी हा कठीण विषय शोधून काढला हे त्या बालपणातील  सगळ्यात मोठं दुःख होतं.शिवाय गणितं काही पाठही करता येत नाही.आठवीपासून कसंबसं बीजगणित, भूमितीत काठावर पास होत दहावीपर्यंत आलो खरे पण भाषा,इतिहास, भूगोलात चांगली गती असणा-या मुलांना गणितातलं अपयश पूर्ण घाबरवून सोडतं अपमानास्पद वाटतं हे कुणाच्याच लक्षात का येत नाही कुणास ठाऊक?

खरं म्हणजे आईवडिलांच्या डाॅक्टर हो, इंजिनिअर हो या नादाने आणि गणिताशी न जमल्याने आयुष्याचंच गणित मात्र बिघडतं हे नक्की.ज्यांचं गणित,सायन्स चांगलं त्यांना हुशार समजल्याने आपण ‘ढ’ आहोत की काय असं मुलांना वाटतं पण मुलांच्या मनाचा,त्यांच्या अडचणींचा विचार कोण करतो?

- Advertisement -

असो तर दहावीत गेल्यावर सगळ्या विषयात डिस्टिंक्शन घेणा-या आमची, बोर्डाच्या परीक्षेत गणिताने दगा दिला तर आईवडिलांची अब्रू जाणार ह्या भीतीने झोप उडाली.वर्गात सगळी हुशार मुलं त्यामुळे सर गणित शिकवताना काही सोप्या स्टेप्स गाळून भराभर पुढे जायचे.मग माझा गोंधळ आणखीच वाढायचा.त्याचा परिणाम युनिट टेस्टमध्ये लालभडक रेष प्रगतीपुस्तकावर मिरवत वडिलांसमोर आली.आम्ही मान खाली घालून उभे.नेहमी जमदग्नीचा अवतार असणा-या वडिलांनी त्यादिवशी चक्क शांतपणे विचारलं,” काय अडचण येतेय गणितात?” मीही हिंमत करून म्हटलं ,”सर खूप घाईने शिकवतात.मधल्या स्टेप्स गाळतात.”दुस-याच दिवशी वडील सरांना भेटले.”तिला शिकवाल का स्वतंत्र?”सरांनी माझी अडचण समजून घेतली .क्लास, ट्यूशन म्हणजे अपमान मानण्याच्या त्या काळात सर रोज शाळा सुटल्यावर घरी यायचे आणि माझी गणिताची तयारी करुन घ्यायचे.वर्षभर त्यांनी शिकवलं .1975 ची बॅच दहावीची पहिली बॅच.नेमकी परीक्षा सुरु झाली आणि गावाकडे आजोबा वारले.आई बाबा तिकडे गेले.एक्झाम सेंटरवर सोडायला सर आले.गणित अगदी सोपा विषय आहे असं म्हणून धीर दिला.परीक्षा संपली.अस्मादिक दीडशेपैकी एकशेतीन मार्क मिळवून छान पास झाले.

दुस-या दिवशी सरांना पेढे द्यायला गेले.”सर ,फी किती द्यायची तुमची?” मी विचारलं.सरांनी पेढा खाल्ला आणि म्हणाले. फी मिळाली मला.छान पास झालीस.मात्र तुला किती मार्क मिळाले हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाही. तर दहा वर्षांनंतर तू कुठे असशील?काय करत असशील हे मला जास्त महत्वाचं वाटतं हे मात्र लक्षात ठेव.सरांचे ते शब्द माझ्या मनावर जादू करुन गेले.त्या शब्दांच्या परीसस्पर्शाने मला आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी दिली.

- Advertisement -

आता आम्ही कौन्सिलिंगमध्ये मुलांचं गोल सेटिंग करतो,सेल्फ अवेअरनेसचं भान वगैरे देतो ते सरांच्या त्या एका वाक्याने दिलं.तू मोठेपणी कोण होणार हे विचारण्यापेक्षा तू पाच ,दहा वर्षांनंतर स्वतःला कुठे पाहतोस असा प्रश्न मुलांच्या डोक्यात सोडून द्या.उत्तर त्यांचं ते शोधायला लागतात.हे शोधणं म्हणजे तरी काय असतं तर माझ्यात असं काय आहे की जे मला आवडतं आणि इतरांनाही.

मुलांनी आतापर्यंत बाहेर खूप काही पाहिलं असतं पण आतमध्ये डोकावून पाहायला सांगणं,शिकवणं हे खूप छान असतं.आपण कोणत्या गोष्टी केल्या तर आपले आईबाबा खुश होतात,आपल्याला शाबासकी मिळते,आईबाबांच्या डोळ्यात कौतुक दिसतं आणि जे केल्याने मला आनंद मिळतो हे सारं यातून मुलांना कळतं आणि मग ते आपले गुण, आपल्या स्ट्रेंग्थस वापरुन, त्यांना शार्पन करुन पुढे पुढे जायला लागतात. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्याकडे कोणत्या क्षमता आहेत? करिअरबद्दल आपण किती सिरियस आहोत आणि भविष्यात काही करण्याची आपली उद्दिष्टं कितपत वास्तव आहेत या विचाराचा कीडा त्यांच्या मनात सोडून द्या.हा कीडा मस्त वळवळत राहतो.मुलं काहीतरी खटपट करत राहतात.त्यांना ते करु दे कारण त्यातूनच खरं म्हणजे स्वतःची ओळख होते.

ही पुढे बघण्याची,पुढे जाण्याची दृष्टी मुलांना द्यायला हवी.तात्पुरता विचार न देता लाॅन्ग टर्म विचार दिला तर सेल्फ इमेज नीट तयार होईल.तू मोठेपणी कोण होणार  यापेक्षा तू दहा वर्षांनंतर कुठे असशील हे शब्द म्हणजे मुलांनी मोठं होण्याची प्रक्रिया सुरु करणं असतं आणि ते तुमच्या हातात असतं .मुलं स्वतःबद्दल विचार करतात,तपासून पाहतात,अजमावून पाहतात आणि हेच खरं मोठं होणं असतं हे समजून घ्या.स्वतःच्या भविष्याचं चित्र रेखाटण्यासाठीचा कुंचला(brush) त्यांच्या हातात द्या आणि त्यांच्यातल्या गुणांचे रंग त्यात भरुन एक मनोहर आणि वास्तववादी स्वप्न सत्यात आणायला त्यांना मदत करा.

(डाॅ.स्वाती विनय गानू, संवाद कौन्सिलिंग क्लिनिक ,पुणे)

- Advertisment -

Manini